नगर: महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज स्थायी समिती सभापती सुभाष लोंढे यांनी वाढीव शिफारसीसह सुमारे 1738 कोटी सुधारित अंदाजपत्रक (बजेट) महापौर ज्योती गाडे यांच्याकडे सादर केले. दरम्यान, महापौर गाडे यांनी सर्व सदस्यांना अंदाजपत्रकाचा अभ्यास करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी देऊन सभा तहकूब केली.
या वेळी उपमहापौर ॲड. धनंजय, आयुक्त यशवंत डांगे, अतिरिक्त आयुक्त गजेंद्र मुक्तेकर, उपायुक्त मेहेर लहारे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. सुधारित अंदाजपत्रकावर निवेदन करताना स्थायी समितीचे सभापती सुभाष लोंढे म्हणाले, घरपट्टी व पाणीपट्टीचा ठराव रद्द करून जुन्या दरानुसार आकारणी करावी. स्थायी समितीकडे आयुक्तांनी 1710 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. स्थायी समितीने नागरिकांच्या गरजेनुसार सुधारणा करून त्यात बदल सुचवले. आर्थिक परिस्थिती लक्षात घेता उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. मालमत्ता हस्तांतरण फी, अनधिकृत बांधकाम नियमितीकरण, मालमत्ता नोंदणी शुल्क, गुंठेवारी विकास, शाळा भाडे, रस्ता फोडणे-जोडणे, अतिरिक्त चटई क्षेत्र व पाणी मीटरद्वारे उत्पन्न वाढविण्यावर भर दिला आहे.
मालमत्ता रिव्हीजनमध्ये खासगी संस्थांकडून झालेल्या अनियमिततेमुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. रस्ते विकासासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. पाणीपट्टीमध्ये 27 टक्के कपात करण्याचाही प्रस्ताव आहे. स्थायी समितीने विविध लेखाशीर्षांतील शिफारशीनुसार मूळ अंदाजपत्रकात 28 कोटींची वाढ झाली असून, सुधारित अंदाजपत्रक 1738 कोटी रुपये झाले आहे.
कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर
बजेट महासभा उशिरा सुरू झाल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. माजी महापौर सुरेखा कदम यांनी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. नगरसेवकांनी फोन केला तरच ठेकेदार कुत्री पकडणार का? मागच्या सभेतही विषय झाला, प्रशासन काहीच दखल घेत नाही. ठेकेदार संस्था नेमके काय करते असा सवाल कदम यांनी केला. त्यावर आयुक्त डांगे यांनी संबंधितांवर कारवाई करण्याची ग्वाही दिली.
पाणीपट्टीत 25 टक्के कपातीची सूचना: लोंढे
आकडे वाढल्याने महापालिकेचे बजेट फुगीर दिसत आहे. शहरातील मालमत्ताधारकांची घरपट्टीची आकारणी करण्यासाठी खासगी संस्थेकडून सर्वे करण्यात आला. मात्र, तो सर्व्हे नागरिकांना मान्य नाही. मालमत्तेवर नव्याने करण्यात आलेल्या कर आकारणीमध्ये भाडेकरी दरानुसार कर आकारणी करण्यात आली आहे. ती कर आकारणी रद्द करून मनपाने ठरवलेेल्या जुन्या दरानुसार कर आकारणी करण्याबाबत सूचना केली आहे. तसेच, यापूर्वी प्रशासकाने घेतलेल्या ठरावानुसार पाणीपट्टी 2400 रुपये करण्यात आली आहे. त्यात 25 टक्के कपात करण्याचा सूचना करण्यात आली आहे. त्यावर महासभेत सविस्तर चर्चा होईल, असे सभापती सुभाष लोंढे यांनी सांगितले.
स्थायी समितीने सुचवलेली वाढ
मालमत्ता नोंदणी फी 1 कोटी 50 लाख
गाळे हस्तांतरण फी 50 लाख
मनपा शाळा भाडे उत्पन्न 50 लाख
रस्ता फोडणी व जोडणी 7 कोटी 50 लाख
अतिरिक्त चटई क्षेत्र प्रिमियम 8 कोटी
शहरात मीटरद्वारे पाणीपुरवठा 8 कोटी
अहिल्यादेवी होळकर पुतळा बसविणे 2 कोटी
पिंपळगाव माळवी येथे नशामुक्ती केंद्र 50 लाख
एकल महिला वसतिगृह व बालसंस्कार केंद्र 1 कोटी
निराधारांसाठी वृद्धाश्रम 1 कोटी
ई लायब्ररीसाठी 25 लाख
केडगाव येथे पाण्याची टाकी 2 कोटी
केडगाव हॉस्पिटल उभारणीसाठी 2 कोटी
केडगाव येथे उद्यानासाठी 1 कोटी
अनाधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी 2 कोटी
कल्याण रोड येथे पाण्याच्या टाकीसाठी 2 कोटी
तारकपूर इंदिरानगर नाल्यासाठी 3 कोटी
शहरात नवीन स्वच्छता गृहांसाठी 50 लाख
महापौर विकास निधी 2 कोटी 50 लाख
उपमहापौर शहर विकास निधी 1 कोटी 50 लाख
स्थायी समिती सभापती विकास निधी 1 कोटी
सभागृह नेता शहर विकास निधी 50 लाख
विरोधी पक्ष नेता शहर विकास निधी 50 लाख