Sangamner UPSC Success: संगमनेर-जामखेडच्या तिघांचा UPSC मध्ये झेंडा

ऋतुजा गायकवाड 106 वी; धनंजय दिघे व निखिल तांबे यांचाही यशस्वी प्रवास
Sangamner UPSC Success
Sangamner UPSC SuccessPudhari
Published on
Updated on

संगमनेर/जामखेड: संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला येथील ऋतुजा अशोक गायकवाड आणि जोर्वे येथील धनंजय संजय दिघे, तसेच जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील निखिल काशिबा ताबे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. आयएएस, आयपीएस, आयआरएस, आयएफएस यांसह विविध केडरमध्ये उमेदवार निवडीसाठी 2025मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. 6) जाहीर झाला. त्यात देशाच्या गुणवत्ता यादीत (ऑल इंडिया रँक) ऋतुजा हिने 106 वा क्रमांक मिळविला. धनंजयला 529 वा आणि निखिल यास 517 वा क्रमांक मिळाला. आकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे हेच या तिघांनी या यशातून सिद्ध केल्याची भावना व्यक्त होत आहे.

Sangamner UPSC Success
Dnyaneshwar Sugar Factory: ज्ञानेश्वर कारखान्याचा 52 वा गळीत हंगाम समाप्त; शेतकऱ्यांना वेळेत ऊस पेमेंट

आयएएस व्हायचेच ठरवले होते

ऋतुजा अशोक गायकवाड हिचे प्राथमिक शिक्षण नान्नज दुमाला येथील प्राथमिक शाळेत, पाचवी-सहावीचे शिक्षण गावातीलच माध्यमिक विद्यालयात झाले. सातवी ते दहावीचे शिक्षण संगमनेर येथील ज्ञानमाता विद्यालयात आणि पुढे बारावीपर्यंत शिक्षण संगमनेरच्याच श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात झाले. झाले. दहावीत तिला 94.80 टक्के आणि बारावीत 95 टक्के गुण मिळाले होते. त्या वेळी गावातील संत ज्ञानेश्वर माऊली मंदिराच्या सभागृहात गावकऱ्यांनी केलेल्या सत्काराला उत्तर देतानाच ऋतुजाने ‌‘आयएएस व्हायचे आहे,‌’ अशी महत्त्वाकांक्षा बोलून दाखवली होती.

Sangamner UPSC Success
Ahilyanagar Municipal Corporation: महानगरपालिकेतील स्थायी व महिला-बालकल्याण समिती निवडणुका 10 मार्चला

बारावीनंतर पदवीसाठी संगणक अभियांत्रिकीला मिळालेला प्रवेश रद्द करून ऋुतुजाने महात्मा फुले कृषी विद्यापीठात (राहुरी) बी. टेक. (ॲग्री) हा शिक्षणक्रम निवडला. पदवी संपादन केल्यानंतर ऋतुजाने केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेच्या तयारीसाठी तीन वर्षांपूर्वी दिल्ली गाठली. वडील प्राथमिक शिक्षक असल्याने सुरुवातीपासूनच त्यांचे मार्गदर्शन आणि भरघोस पाठिंबा मिळाला. मुलीने आयएएस व्हावे, हे त्यांचेही स्वप्न होतेच. ते स्वप्न आणि स्वतःची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी ऋतुजाने रात्रंदिवस अभ्यास केला. मागील वर्षी (2025) अवघ्या सहा गुणांनी तिची संधी हुकली. मात्र यंदा दुसऱ्या प्रयत्नात तिने यशाला गवसणी घातली. आपल्या यशात आई-वडील, शिक्षक, चुलते यांचे मोलाचे योगदान असल्याचे ती अभिमानाने सांगते. नान्नज दुमाला येथील ती पहिली आयएएस ठरणार आहे. जे स्वप्न पाहिले, ते सत्यात उतरविण्यासाठी कष्ट आणि जिद्द आवश्यक असल्याचे ती आवर्जून सांगते.

Sangamner UPSC Success
Minor Girls Missing Ahilyanagar: नगर तालुक्यात दोन दिवसांत दोन अल्पवयीन मुली बेपत्ता; अपहरणाचे गुन्हे दाखल

स्वप्न बाळगले होते

जोर्वे येथील धनंजय संजय दिघे यास यूपीएससीत 529 वी रँक मिळाली. ते म्हणाले, की मी शेतकरी कुटुंबात जन्मलो असलो तरी शेतीत फारसे काम केलेले नाही. सुरुवातीपासूनच शिक्षणावर लक्ष केंद्रित करून अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले होते. वडील उच्चशिक्षित असल्याने त्यांच्याकडून प्रेरणा घेतली. सुरुवातीला स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियममध्ये प्राथमिक व दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. नंतर बारावीपर्यंतचे शिक्षण ओहोरा कॉलेजमध्ये घेतल्यानंतर पुणे येथे डी. वाय. पाटील कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअर ही पदवी संपादन केली. नंतर पुण्यातूनच यूपीएससीचा अभ्यास सुरू केला. सातत्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करून 2024 पासून मी यूपीएससी परीक्षा देत आहे. दोनदा प्रयत्न केला; मात्र यश मिळाले नाही. तिसऱ्या प्रयत्नांत मात्र मला यशाला गवसणी घालता आली. या यशात माझ्या परिवारातील सर्व सदस्य, मित्र, तसेच शिक्षकांचेही योगदान आहे, असे धनंजय कृतज्ञतेने नमूद करतो.

Sangamner UPSC Success
Taklibhan Leopard Sightings: टाकळीभान परिसरात बिबट्यांचा धुमाकूळ; दिवसाढवळ्या तीन बिबट्यांचे दर्शन

दृढ संकल्पाला यश

ग्रामीण भागातूनही मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करता येतात, याचा प्रत्यय जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील निखिल काशीबा तांबे याला मिळालेल्या यशाने दिला. अवघ्या 22 व्या वर्षी भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) पात्र ठरल्याचे त्याने सांगितले. जामखेड एस.टी. आगारात ‌‘इलेक्ट्रीशियन‌’ म्हणून कार्यरत असलेल्या काशीबा तांबे यांचा निखिल सुपुत्र. साध्या व कष्टकरी कुटुंबातून येऊनही निखिलने लहानपणापासून शिक्षणात सातत्य राखत उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेवले. आर्थिक व सामाजिक मर्यादा असतानाही त्याने जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर हे यश मिळवले. ‌‘मनापासून ठरवले आणि सातत्याने मेहनत घेतली तर अशक्य काहीच नाही,‌’ हा संदेश त्याच्या यशातून मिळत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. निखिलच्या यशाची बातमी समजताच अरणगावसह संपूर्ण जामखेड तालुक्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अरणगावसारख्या ग्रामीण भागातून घडलेला हा यशस्वी तरुण आज अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news