

नगर : महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती, महिला व बालकल्याण समिती सभापती व उपसभापतिपदांची निवडणूक 10 मार्च रोजी होणाऱ्या सभेत पार पडणार आहे. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी या संदर्भात आदेश काढले आहेत. त्यानुसार सकाळी 11 वाजता स्थायी समिती सभापती व त्यानंतर महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याची माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींनुसार या निवडीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांची विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. 10 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. यात प्रथम स्थायी समिती सभापती पदाची निवड प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर महिला व बालकल्याण समिती सभापती व उपसभापती निवडीचे कामकाज पार पडेल, असे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.
दोन्ही समित्यांसाठी अर्ज पत्र दाखल कार्यक्रम असा
स्थायी समिती सभापती पद
अर्ज वितरण : शुक्रवार, 6 मार्च 2026 ते सोमवार, 9 मार्च 2026
अर्ज स्वीकारणे : 9 मार्च 2026 रोजी दुपारी 3:00 ते 5:00 वाजेपर्यंत (नगरसचिव कार्यालय)
छाननी व निवड : 10 मार्च 2026 रोजी सकाळी 11:15 वाजता विशेष सभेत
अर्ज मागे घेणे : वैध उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर 15 मिनिटांच्या आत
महिला व बालकल्याण समिती (सभापती व उपसभापती)
अर्ज वितरण : 6 मार्च 2026 ते 9 मार्च 2026, सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत
अर्ज स्वीकारणे : 9 मार्च 2026 रोजी दुपारी 3:00 ते 5:00 वाजेपर्यंत
छाननी : 10 मार्च 2026 रोजी स्थायी समिती सभापतीची निवड प्रक्रिया संपल्यानंतर
अर्ज मागे घेणे : उमेदवारांची नावे वाचून दाखवल्यानंतर 15 मिनिटांच्या कालावधीत