

टाकळीभान : टाकळीभानसह परिसरात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. टाकळीभान-बेलपिंपळगाव शिवेवरील बल्हई नाला परिसरात बिबट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. त्यातच, काल दिवसाढवळ्या तब्बल तीन बिबट्यांचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
येथील ओढ्यालगत दाट झाडी व जवळच असलेली लोकवस्ती यामुळे बिबट्यांनी येथे अधिवास निर्माण केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. रात्रीच्या वेळी हे बिबटे वाड्या वस्त्यांवर जाऊन कुत्रे व पशुधनावर हल्ले करत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
दिवसा हे बिबटे मका व उसाच्या शेतात आसरा घेत असून मंगळवार (दि. 3 मार्च) सकाळी आठच्या सुमारास टाकळीभान सोसायटीचे अध्यक्ष मंजाबापू थोरात यांच्या उसाच्या शेतात तीन बिबटे जाताना काही ग्रामस्थांनी पाहिले असून विनोद वलटे, संदीप वलटे, बंडू तर्हाळ आदी शेतकऱ्यांच्या शेतातही बिबट्यांचा वावर असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, दिवसा बिबट्यांचे दर्शन होत असल्याने शेतात काम करणारे शेतकरी, तसेच टाकळीभान येथे शाळेत जाणारे विद्यार्थी धास्तावले आहेत. वनविभागाकडून पिंजरा लावण्यात आला असला तरी अद्याप एकही बिबट्या त्यात अडकलेला नाही. त्यामुळे तातडीने वनविभागाने तातडीने उपाययोजना करून या परिसरातील बिबटे जेरबंद करावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.