

संगमनेर: दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांचा चारा व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील पशुधन वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. तर पावसावर अवलंबून असलेल्या पिकांचे ३९ हजार ६६७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून अंदाजित नुकसान ३३ कोटी ७० लाख रुपये आहे. तर फळपिकांचे ४ हजार ९२९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, अंदाजित नुकसान ११ कोटी रुपये आहे.
तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता पशुधन वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. पर्जन्यमान, पिक नुकसान, पीकविमा व टंचाई निवारण उपाययोजनांचा आढावा, रोजगारनिर्मिती, वन्यप्राण्यांसाठी पाणी नियोजन आणि डिजिटल क्रॉप सर्वे पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. तालुक्यातील १७४ गावांतील पात्र लाभार्थ्यांच्या याद्या अपलोड करण्याची कार्यवाही सुरू आहे. पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या प्रचलित निकषांनुसार व नियमांनुसार मदत मिळण्यासाठी आवश्यक नोंदी आणि पडताळणी वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत. पात्रतेनुसार ५ हजार रुपयांच्या मदतीसंदर्भातील कार्यवाहीही नियमानुसार करण्यात येत आहे.
तालुक्यात एकूण २ लाख ४३ हजार ८२९ प्लॉट असून, १ लाख २६ हजार ४३० खातेदारांच्या पिक सर्वेक्षणाच्या नोंदी पूर्ण झाल्या आहे. क्षेत्रनिहाय प्रगती ५९.४५ टक्के असून, या कामासाठी ३२४ सर्वेक्षक कार्यरत आहेत. टंचाईसदृश परिस्थितीमध्ये वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी वन विभागामार्फत नियोजन सुरू आहे. झालेल्या बैठकीत उन्हाळ्याच्या काळात वनक्षेत्रातील वन्यप्राण्यांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित वन अधिकारी व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना नियोजनाच्या सूचना दिल्या आहे.
चारा-पाण्याचे नियोजन महत्वाचे
सन २०२४ च्या पशुगणनेनुसार तालुक्यातील पशुधनाची नोंद पुढीलप्रमाणे गाय/बैल १ लाख ८७ हजार ७१७, वासरे २२ हजार ६१९, म्हशी ७७७, शेळ्या ६५ हजार ५४८, मेंढ्या ४३ हजार ४३८, घोडे/खेचरे २३४, गाढवे ३९, डुकरे २६८, कोंबड्या ५ लाख ३२ हजार २१६ आहे. ही संख्या पाहता चारा-पाण्याचे नियोजन महत्वाचे आहे.
कमी जागेत चारा उत्पादनासाठी हायड्रोफोनिक
पशुसंवर्धन विभागामार्फत २२ टन चारा बियाणे तर कृषी विभागामार्फत २१० क्विंटल बियाणे उपलब्धतेबाबतची कार्यवाही नमूद केली आहे. कमी जागेत चारा उत्पादनासाठी हायड्रोफोनिक पद्धतीचाही विचार करण्यात येत आहे. कृषी, पशुसंवर्धन, वन, जलसंधारण आणि जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागांनी रोजगार निर्मितीची कामे निश्चित करावीत, अशा सूचना दिल्या आहेत.
तालुक्यातील ५९ गावांसाठी सुमारे १२.३६ कोटी रुपयांचा टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. आराखड्यातील लोकसंख्या १ लाख १० हजार ३९ आणि पशुधन ८७ हजार ८१४ इतके नमूद आहे. सन २०१८-१९ मध्ये कमाल ७६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला होता. नियोजनामध्ये नागरिकांसाठी ३९ आणि पशुधनासाठी ६५ टँकरची तरतूद नमूद आहे. सद्या ९ गावांमध्ये ९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
तहसीलदार धीरज मांजरे