

नगर तालुका: छत्रपती संभाजीनगर महामार्गाची दयनीय अवस्था झाली असताना महामार्ग दुरुस्तीचे काम मागील महिन्यात सुरू करण्यात आले होते. परंतु खड्डे बुजविण्याचे काम सलग पट्ट्यात करण्यात आलेले नाही. काही टप्पे सोडून खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले आहे. सद्यःस्थितीत खड्डे बुजविण्याचे काम बंद असल्याची माहिती नागरिकांकडून मिळत आहे. धनगरवाडी परिसरात सुमारे एक किलोमीटर अंतरावर महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे.
छत्रपती संभाजीनगर महामार्गावर जून महिन्याच्या सुरुवातीलाच मोठ मोठे खड्डे पडलेले होते. त्यातच मनमाड महामार्गावरील वाहतूक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून वळविण्यात आल्याने वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. खड्डे बुजवताना सलगपणे न बुजविता टप्प्याटप्प्याने बुजविण्यात आले आहेत. धनगरवाडी शिवारात तर महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. या परिसरातील एक किलोमीटर अंतर पार करण्यासाठी खड्ड्यांमुळे अर्धा तास वेळ जात असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. तसेच वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे.
धनगरवाडी शिवारात रस्त्याची अवस्था पाहता याला महामार्ग म्हणता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच जेऊर परिसरातही सर्व खड्डे बुजविण्यात आले नाहीत. जेऊर बसस्थानक ते महावितरण कंपनीच्या चौकादरम्यान रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. धनगरवाडी शिवारात तर महामार्गावर डांबरही शिल्लक राहिलेले नाही. संपूर्णतः रस्ता उखडला गेला आहे. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणे अवघड झाले आहे. खड्डे व रस्त्याच्या दुरवस्थेमुळे इंधन, वेळेचा अपव्यय तसेच आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
खड्डे बुजविण्याचे सुरू असलेले काम अचानकपणे बंद करण्यात आल्याची माहिती नागरिक देत आहेत. महामार्गावर अद्याप अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असून, खड्डे बुजविण्याचे, तसेच महामार्ग दुरुस्तीचे काम का बंद करण्यात आले याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. धनगरवाडी परिसरातील एक किलोमीटरचा रस्ता पार करणे म्हणजे तारेवरची कसरत असल्याचा अनुभव वाहनचालक व मालकांना येत आहे. धनगरवाडी परिसरातील महामार्गाची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, तसेच इतरत्रही असलेले खड्डे बुजविण्याची मागणी धनगरवाडी, जेऊर, इमामपूर, खोसपुरी, शेंडी, पोखर्डी परिसरातील ग्रामस्थांमधून होत आहे.
‘अधिकाऱ्यांनी धनगरवाडी परिसरात पाहणी करावी’
धनगरवाडी परिसरामध्ये महामार्गाची खूपच दयनीय अवस्था झाली आहे. खड्डे बुजवताना हा टप्पा का सोडण्यात आला, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी एकदा धनगरवाडी परिसरात महामार्गाची पाहणी करावी अशी मागणीही ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.