

घारगाव: पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गातील अचानक बदलाने अकोले, संगमनेर, जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील जनभावना दुखावल्या गेल्या आहेत. आक्रमक जनता पुणे-नाशिक रेल्वे मार्गासाठी विविध प्रकारचे आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे.
अशातच संगमनेर तालुक्यातील पठार भागातील बोटा येथील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून दि. 12 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको जनआंदोलन केले जाणार असल्याचे निवेदन प्रशासनाला दिले आहे.
अकोले तालुका निसर्गाने नटलेला व आदीवासी बहुल तालुका आहे.अनेक पर्यटक या तालुक्याला मीनी जम्मू काश्मीर असे संबोधतात. या रेल्वे मार्गामुळे राज्यातील सर्वात उंच कळसूबाईचे शिखर, सांधणदरी, हरीश्चंद्र गड, काळीज हेलवणारा कोकणकडा, भंडारदरा धरण, रंधा धबधबा, शिवजन्मभूमी, भीमाशंकर अशा अनेक पर्यटन स्थळांचा विकास होईल. या रेल्वे मार्गामुळे अतिशय अल्प दरात शेतकरी बांधवांना मुंबई, पुणे, नाशिक या औद्योगिक शहरांतील बाजारपेठेत आपला कृषी उत्पन्न माल नेता येईल.
आदिवासी समाजाचे व शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी हा रेल्वे मार्ग महत्वाचा आहे. संगमनेर,अकोले तालुक्यातील तरुणांना पठार भागातील तरुणांना रोजगाराच्या व व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील. तरुणांना 1 तासात शिक्षणासाठी, नोकरीसाठी व व्यापारासाठी पुणे, नाशिकला येथे जाता येता येईल.
अनेक वर्षापासून संगमनेर, अकोले,जुन्नर तालुक्यातील जनता या रेल्वे मार्गाकडे एक आशेचा किरण म्हणून पाहत असून हा रेल्वेमार्ग बदलल्यामुळे खुप मोठा जनआक्रोश अकोले, सगंमनेर आणि जुन्नर तालुक्यातील जनतेत निर्माण झालेला आहे. संतापलेली जनता विविध प्रकारचे आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असल्याचे दिसून येत आहे. अशातच संगमनेर अकोले तालुक्याच्या सरहद्दीवरून पुणे-नाशिक रेल्वे मार्ग करण्यात यावा. बोटा येथे रेल्वे स्टेशन उभारण्यात यावे. या मागणीसाठी विकास क्रांती सेना येत्या 12 जानेवारी रोजी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको जनआंदोलन करणार असल्याचा इशारा विकास क्रांती सेनेचे अध्यक्ष भगवान काळे, उपाध्यक्ष जालिंदर गागरे, कार्याध्यक्ष संतोष फापाळे यांनी दिला आहे.