

नेवासा: अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात न्यायालयाने आरोपीस वीस वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. नेवासा तालुक्यात ऑक्टोबर 2021 मध्ये ही घटना घडली होती.
देवा उर्फ देविदास शेषराव उर्फ शशिकांत कुंडारे अशी शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या खटल्याची हकीगत अशी: आत्याच्या घरी स्वयंपाक करण्यासाठी जाते असे सांगून अल्पवयीन मुलगी 18 ऑक्टोबर 2021 रोजी घराबाहेर पडली. ती पुन्हा माघारी न आल्याने कुटुंबियांनी तिची शोधाशोध केली. त्यावेली देवीदास कुंडारे याने तिला फूस लावून पळवून नेल्याची चर्चा कानावर आल्याने कुटुंबियांनी त्याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला.
वडिलांच्या सहकार्याने देवीदास कुंडारे याने ती अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही तिचे अपहरण करत अहिल्यानगरच्या सावेडीत भाडोत्री खोलीत ठेवले. तेथे लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. पोलिसांनी पिडितेचा शोध लावल्यानंतर वैद्यकीय तपासणी केली. पिडितेचा 164 नुसार न्यायालयासमोर जबाब नोंदविण्यात आला. पिडितेच्या जन्माचा दाखला घेत ती अल्पवयीन असल्याबाबत साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी गुन्ह्याचा तपास करत न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
न्यायालयातील सुनावणीत वैद्यकीय अधिकारी, पिडितेचा आणि फिर्यादी व तपासी अधिकाऱ्यांची साक्षी जबाब महत्त्वाचे ठरले. सरकारी अभियोक्ता विष्णूदास भोर्डे, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता देवा काळे यांनी सरकारच्यावतीने बाजू मांडली. घटनेवेळी पिडिताचे वय 15 वर्षापेक्षा कमी होते. याची माहिती असूनही लग्नाचे अमिष दाखवत तिचे अपहरण करत बळजबरीने अत्याचार केल्याची बाब सरकारी पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.
सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी देवा उर्फ देविदास शेषराव उर्फ शशिकांत कुंडारे याला पोक्सो कलम 6 नुसार 20 वर्षे तुरूंगवास, कलम 366 नुसार 2 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व दंड अशी शिक्षा नेवाशाचे विशेष जिल्हा न्यायाधीश आर. आर. हस्तेकर यांनी सुनावली. पैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार रमेश चौहान यांनी सहाय्य केले.