

शशिकांत पवार
नगर तालुका: संपूर्ण नगर तालुका निसर्ग विविधतेने नटलेला आहे. तालुक्यात गर्भगिरीच्या डोंगररांगा असून त्यामध्ये विविध वन्यप्राणी व दुर्मिळ औषधी वनस्पतींचा खजिना आढळतो. डोंगरांना लागलेल्या वणव्यांमुळे मोठी वनसंपदा जळून नष्ट होत असते तर वन्य प्राण्यांचे देखील हाल होत असतात. त्यामुळे वनविभाग अलर्ट मोडवर आला असून तालुक्यातील वनसंपदेच्या रक्षणासाठी जाळरेषा मारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
अहिल्यानगर तालुक्यात वनविभागाचे जेऊर, गुंडेगाव, नगर असे तीन मंडळ कार्यरत आहेत. तिन्ही मंडळामध्ये गर्भगिरीच्या डोंगररांगा मोठ्या प्रमाणात आढळून येतात. वनविभागाचे सुमारे साडेसहा हजार हेक्टर क्षेत्र तालुक्यामध्ये आहे. तसेच आर्मीचे बाराशे हेक्टर क्षेत्र आहे. तर विविध गावांच्या खासगी डोंगररांगादेखील मोठ्या प्रमाणात आहेत. तालुक्यातील जंगलांमध्ये विविध दुर्मिळ अशा औषधी वनस्पती आढळून येतात.
हरीण, काळवीट, लांडगा, कोल्हा, ससा, साळिंदर, तरस, खोकड, रानमांजर, उदमांजर, रानडुक्कर, भटके कुत्रे, बिबट्या, मोर तसेच विविध जातींच्या पक्षांचा मुक्त संचार पाहावयास मिळतो. पावसाळ्यानंतर तर डोंगराच्या हिरवळीवर वन्यप्राणी मुक्तपणे बागडताना दिसतात. विविध निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करत असतात. कोसळणारे धबधबे, खळाळणारे पाणी, मुक्त विहार करणारे पशुपक्षी, डोंगराने पांगरलेला हिरवा शालू डोळ्याचे पारणे फेडत असतात.
निसर्गसंपदेला सर्वात जास्त फटका बसतो तो वणव्यांचा. वणव्यांमध्ये शेकडो हेक्टर क्षेत्र जळून खाक होत असते. त्यामध्ये दुर्मिळ औषधी वनस्पती, झाडे, सरपटणारे प्राणी, पशुपक्षी यांचे अतोनात हाल होत असतात. पावसाळ्यात केलेली वृक्षलागवड तसेच संगोपन या सर्व बाबींवर पाणी फिरत असते. त्यामुळे वणव्यांपासून वनसंपदेचे संरक्षण व्हावे यासाठी थंडीमध्येच वनविभागाकडून ‘जाळरेषा’ मारण्याचे काम करण्यात येते.
गर्भगिरीच्या डोंगररांगांमध्ये दुर्मिळ औषधी वनस्पती तसेच विविध वन्य प्राण्यांचा मुक्त संचार आढळून येतो. संपूर्ण तालुका निसर्ग विविधतेने नटलेला आहे. वणव्यांमुळे निसर्गसंपदेचे मोठे नुकसान होत असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी वणव्यांबाबत काळजी घेण्याची गरज आहे. वनविभागाच्या वतीने वनसंपदेच्या संरक्षणासाठी जाळरेषा मारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
अविनाश तेलोरे, वनपरिक्षेत्र अधिकारी
दुर्दैवाने एखाद्या ठिकाणी वणवा लागला तर तो आटोक्यात आणण्यासाठी जाळरेषा खूप फायदेशीर ठरते. तालुक्यामध्ये वनसंपदेच्या संरक्षणासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू करण्यात आले आहे. साधारणपणे 15 डिसेंबरनंतर जाळरेषा मारण्याचे काम सुरू करण्यात येत असते. परंतु चालू वर्षी डिसेंबरच्या सुरुवातीलाच जाळरेषा मारण्याचे काम वनविभागाने हाती घेतले आहे
नागरिकांनी वनक्षेत्रामध्ये धूम्रपान करू नये. तसेच स्वयंपाक बनवू नये. वनक्षेत्रालगत असणाऱ्या शेतकऱ्यांनी आपले बांध जाळू नयेत. प्रत्येक गावामध्ये वणवाविरोधी पथक तयार करण्याची गरज आहे. वणवा लागेल असे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. वणवा आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे.
मनेष जाधव, वनरक्षक