

राहुरी: मी भाजपमध्ये जाणार असल्याचे कधीही म्हटले नाही. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर मी मत व्यक्त केले होते; मात्र त्याचा विपर्यास करण्यात आला. मी सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कार्यकर्ता आहे. राहुरीतील मतदार, कार्यकर्ते व हितचिंतकांच्या भावना जाणून घेतल्याशिवाय कोणताही राजकीय निर्णय घेतला जाणार नाही, असे सांगत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम ठेवला.
राहुरीचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीचे राजकारण पेटले असून मतदारसंघात विविध राजकीय समीकरणे रंगू लागली आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर भगवा गमछा परिधान केलेल्या तनपुरे यांच्या छायाचित्रांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली होती. लवकरच राहुरीचा आवाज अधिवेशनात घुमणार, अशा आशयाच्या पोस्टमुळे त्यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत चर्चा अधिकच रंगल्या. तनपुरे हे भाजपच्या काही नेत्यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चाही जोर धरत होत्या. गुहा येथे झालेल्या धार्मिक कार्यक्रमात त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे कर्डिले समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. इतकेच नव्हे तर तनपुरेंना भाजपमध्ये प्रवेश देऊ नये, यासाठी कर्डिले समर्थकांनी जिल्हा व राज्य पातळीवरील नेत्यांकडे धाव घेत आपली नाराजी व्यक्त केली होती.
दरम्यान, राहुरी येथे काल पत्रकार परिषदेत भगवा गमछा परिधान करून उपस्थित राहिलेल्या तनपुरे यांनी निवडणुकीच्या मुद्यावर थेट घोषणा करण्याचे टाळले. तनपुरे यांनी प्रथम राहुरी नगरपरिषदेच्या विविध विकासकामांची माहिती देत शहरातील सौर ऊर्जा प्रकल्पामुळे पाणीपुरवठा व्यवस्थेला नवी दिशा मिळणार असल्याचे सांगितले. या प्रकल्पामुळे पाणीपट्टी वाढणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आपल्या आमदारकीच्या काळातील विकासकामांचा उल्लेख करत तनपुरे म्हणाले, राहुरी मतदारसंघासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. निळवंडे धरणाचे पाणी उपलब्ध करून दिले, सौर कृषी सबस्टेशन उभारून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी प्रयत्न केले, गावोगावी वीज रोहित्र दिले. मात्र गेल्या वर्षभरात प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे विकासकामांना ब्रेक लागल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, नगरसेवक अविनाश म्हस्के, प्रशांत डौले, आरिफ शेख, महेश उदावंत, नंदू तनपुरे, निलेश जगधने आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे देशाच्या राजकारणातील योगदान अधोरेखित करत ‘विरोधक असलो तरी चांगल्या कामाचे कौतुक करणे आवश्यक’ असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचे त्यांनी विशेष कौतुक केले. ब्राम्हणी परिसरात लवकरच सौर कृषी सबस्टेशन सुरू होऊन शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.