

नगर: व्याजाच्या पैशांच्या वसुलीसाठी आलेल्या सावकाराने मालकाच्या गैरहजेरीत कामगाराला बेदम मारहाण करून घरात डांबून ठेवले. ही घटना स्टेशन रोड परिसरातील आनंदनगर येथे घडली. कोतवाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घत कामगाराची सुटका केली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दीपक लाल गुगळे (रा. आनंदधाम, अहिल्यानगर) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत शंभुलाल गोबालजी भिल (वय 22, मूळ रा. राजस्थान) याने पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादी शंभुलाल हा भगवानलाल गुजर यांच्या चायनीज हॉटेलवर कामाला होता. गुजर यांनी संशयित दीपक गुगळे याच्याकडून दोन लाख रुपये व्याजाने घेतले होते. मागील दोन महिन्यांचे व्याज न दिल्याने गुगळे शुक्रवारी दुपारी मालक घरी नसताना आला. त्याने शंभुलालला मालकाबाबत विचारणा करीत शिवीगाळ केली.
मालक घरी नाहीत मला कशाला शिवीगाळ करता असे शंभुलाल म्हणाला. त्याचा राग आल्याने गुगळे याने त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घरात ढकलले. घरात डांबून बाहेरून कुलूप लावून पळ काढला. शंभुलालने आरडाओरड केल्याने अन्य कामगार तिथे आला. त्यांनी पोलिसांना बोलावून घेतले आणि पोलिसांनी शंभुलाल सुटका केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.