

राहुरी: ऑपरेशन मुस्कान अभियानांतर्गत राहुरी पोलिसांनी आणखी एक यशस्वी मोहीम राबवून अपहृत अल्पवयीन मुलीचा सुखरूप शोध लावला आहे. दरम्यान, या वर्षात शोध लावलेली ही तब्बल 98 वी मुलगी ठरली आहे. पोलिसांच्या तांत्रिक विलेषण व गोपनिय बातमीदारांच्या माहितीतून ही कारवाई यशस्वी करण्यात आली.
(दि. 18 फेब्रुवारी 2025) रोजी अल्पवयीन मुलगी रहस्यमयरीत्या बेपत्ता झाली. याबाबत राहुरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी पाठपुराव्यातून मुलीचा शोध लावून, तिला सुरक्षितरित्या बालकल्याण समितीकडे सुपूर्द केले.
पसार आरोपींचा शोध घेण्यासाठी राहुरी पोलिसांनी तांत्रिक पुरावे तपासणे, कॉल रेकॉर्डस्, लोकेशन ॲनालिसिस आदी माध्यमांचा वापर सुरू केला आहे. संपूर्ण मोहीम जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाक्चौरे व उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी पार पडली. कारवाईत पोलिस निरीक्षक संजय ठेंगें यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक समाधान फडोळ, पोलिस काँस्टेबल रविंद्र कांबळे, श्रीरामपूर मोबाईल सेलचे पोलिस काँस्टेबल धनाड व दरेकर यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.
अपहृत मुलीकडून स्वतःला गंभीर इजा करण्याचा प्रयत्न
कारवाईदरम्यान अपहृत मुलीने स्वतःला गंभीर इजा करण्याचा प्रयत्न केला, परंतू पोलिसांनी तिला बालंबाल वाचवले. या गोंधळाचा फायदा घेऊन, मुख्य आरोपी प्रवीण बाबासाहेब कोहकडे (21, रा. मोमीन आखाडा, ता. राहुरी) हा पसार झाला. विशेष असे की, या आरोपीविरुद्ध यापूर्वीही अल्पवयीन मुलीचे अपहरण व लैंगिक अत्याचाराचे गंभीर गुन्हे पोलिसात दाखल आहेत. मागील गुन्ह्यांमध्ये तो तब्बल अडीच महिने तुरुंगात होता. याप्रकरणी इतर दोन आरोपींना पोलिसांनी 18 मार्च 2025 रोजी अटक केली होती.
मुलांच्या मोबाईल ॲप्ससह मित्र परिवारावर लक्ष ठेवावे
अल्पवयिन मुली-मुलांसमवेत पालकांनी सतत संवाद साधावा. त्यांच्या वागणुकीतील अचानक बदलासह ताण-तणावाकडे लक्ष द्यावे, मुले वापरणाऱ्या मोबाईल ॲप्ससह मित्र परिवारावर बारिक लक्ष ठेवावे, असे आवाहन राहुरी पोलिसांकडून पालकांना करण्यात आले आहे.