

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ आहे. त्यामुळे शहरभरातून सर्वच राजकीय पक्षांसह माजी नगरसेवक, पदाधिकारी व इच्छुकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. मतदार यादी फोडताना एका प्रभाग मतदारांची नावे गायब करण्यात आली आहेत. त्याबाबत मंगळवारी (दि.25) एकूण 659 हरकती दाखल करण्यात आल्या. क क्षेत्रीय कार्यालयाकडे सर्वाधिक 189 हरकती प्राप्त झाल्या आहेत. सहा दिवसांत 2 हजार 352 हरकती महापालिका व सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडे जमा झाल्या आहेत.
निवडणुकीसाठी महापालिकेने प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी गुरूवारी (दि.20) प्रसिद्ध केली. प्रभागातील अनेक मतदारांची नावे काढून आजूबाजूच्या प्रभागात जोडण्यात आली आहे. त्या प्रकारामुळे राजकीय पदाधिकारी, माजी नगरसेवक, इच्छुक व कार्यकर्ते संताप व्यक्त करीत आहेत. काही माजी नगरसेवकांची नावेही मतदार यादीतून गायब झाली आहेत. महापालिका कर्मचार्यांनी मतदार यादी घोळ केल्याने प्रशासनाला धारेवर धरले जात आहे. यामुळे मोठ्या संख्येने हरकती दाखल करण्यात येत आहेत.
यादीवर एकूण 1 हजार 693 हरकती महापालिका निवडणूक विभागास प्राप्त झाल्या होत्या. मंगळवारी (दि.25) एका दिवसात एकूण 659 हरकती दाखल करण्यात आल्या. मतदार यादी कक्षाकडे एकूण 21 हरकती दाखल झाल्या आहेत. क क्षेत्रीय कार्यालयाकडे सर्वांधिक 189 हरकती दाखल झाल्या आहेत. गक्षेत्रीय कार्यालयाकडे 115, फ क्षेत्रीय कार्यालयाकडे 112 आणि ह क्षेत्रीय कार्यालयाकडे 106 हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. ब क्षेत्रीय कार्यालयाकडे 72, अ क्षेत्रीय कार्यालयाकडे 28, ड क्षेत्रीय कार्यालयाकडे 9 आणि ई क्षेत्रीय कार्यालयाकडे 7 हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. निवडणूक विभागाने सुमोटो 61 तक्रारी दाखल करून घेतल्या आहेत. एकूण 413 जणांनी माझे नाव प्रभागातून गायब झाल्याची तक्रार केली आहे. तर, 185 मतदारांच्या नावावर आक्षेप नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, मतदार यादीवर गुरूवार (दि.27) पर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत आहे.
मतदार यादीतील घोळाबाबत तक्रारींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने पत्रकार परिषदेत घेऊन महापालिका प्रशासनावर अनेक जाहीर आरोप केले. तसेच, महाविकास आघाडीने महापालिका भवनासमोर मतदार यादी जाळत निषेध आंदोलन केले. तसेच, भाजपाचे आमदार अमित गोरखे यांनी मतदार यादीतील घोळाबाबत आपेक्ष घेतले आहेत. तसेच, विविध राजकीय पक्ष, माजी नगरसेवक व इच्छुकांकडून मोठ्या संख्येने तक्रारी दाखल करण्यात येत आहेत. त्याची गंभीर दखल घेऊन आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी तक्रारीनुसार त्यांनी तातडीने दोन बैठक घेऊन अधिकारी व क्षेत्रीय अधिकार्यांची शेलक्या शब्दात कानउघाडणी केली. त्यांनी मतदार यादीची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पडताळणी करण्यास बीएलओ व कर्मचार्यांना ताकीद दिली आहे. त्यानुसार प्रत्यक्ष जागेवर जावून मतदारांच्या नावाची शहानिशा करण्यात येत आहे. खरंच मतदारांची नावे दुसर्या प्रभागात गेल्याची माहिती गोळा केली जात आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच, दुबार मतदार यादीची पडताळणी करण्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ नेमण्यात आले आहे. ते कर्मचारी त्या मतदारांचा शोध घेऊन त्यांच्या नावाची खातरजमा करत आहेत. आयुक्तांनी सक्त सूचना दिल्याने अधिकारी, बीएलओ व इतर कर्मचारी आता कामाला लागले आहेत. तसेच, मतदार यादींच्या हरकती, तक्रार व सूचनांवर कार्यवाही करण्यासाठी सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी प्रत्येकी एका उपायुक्तांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच, सर्व आठ क्षेत्रीय कार्यालय तसेच, महापालिका भवनातील निवडणूक कार्यालय आणि गांधीनगर, पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात छापील मतदार यादी नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत. तसेच, मतदारांना आपले नाव कोणत्या प्रभागात आहे, हे पाहण्यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर लिंक देण्यात आली आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण 128 जागांसाठी दुरुस्तीसह आरक्षण सोडत सोमवारी (दि.17) जाहीर केली होती. त्यावर मुदतीमध्ये एकूण 72 हरकती महापालिकेच्या निवडणूक विभागास प्राप्त झाल्या आहेत. त्या हरकतींवर आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर हे निर्णय घेणार आहे. त्यानुसार त्याचा अहवाल तयार करून तो राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला जाणार आहे.
महापालिकेने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात 11 नोव्हेंबरला सर्वांसमोर जाहीर आरक्षण सोडत काढण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाच्या दुरूस्तीनंतर आरक्षणाची यादी सोमवारी (दि.17) प्रसिद्ध करण्यात आली. श्रीधरनगर, भाटनगर, पिंपरी भाजी मंडई प्रभाग क्रमांक 19 आणि दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी प्रभाग क्रमांक 30 मधील प्रत्येकी दोन जागांच्या आरक्षणात बदल करण्यात आले. त्यामुळे सर्वांधिक हरकती प्रभाग क्रमांक 30 बाबत दाखल करण्यात आल्या आहेत.
दाखल हरकती व सूचनांनुसार आरक्षणाबाबत आयुक्त हर्डीकर हे निर्णय घेणार आहेत. तो अहवाल राज्य निवडणूक आयोगास सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर आरक्षणाची अंतिम अधिसूचना आयुक्त प्रसिद्ध करणार आहेत, असे महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.
महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादी 2025 मधील मोठ्या प्रमाणातील त्रुटी, विसंगती आणि नागरिकांच्या वाढत्या तक्रारी आहेत. या संबंधित पिंपरी-चिंचवड भाजप पक्षाच्या वतीने राज्य निवडणूक आयोगाकडे निवेदन देण्यात आले. मतदार यादीतील गोंधळ तात्काळ दूर करण्याची मागणी केली. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, प्रारूप मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे वगळली जाणे, चुकीच्या प्रभागात स्थलांतरित होणे, दुबार नोंदी, पत्त्यातील त्रुटी तसेच यादी पाहण्यासाठी नागरिकांना कोणतीही प्रभावी डिजिटल सुविधा उपलब्ध नसणे-या सर्व गोष्टींमुळे शहरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मतदारांना योग्य संधी मिळावी यासाठी हरकती आणि सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत किमान 10 दिवसांनी वाढविण्याची मागणी केली आहे. तसेच, नागरिकांना सोयीस्कर व्हावे म्हणून विशेष हेल्पडेस्क, ऑनलाइन शोध सुविधा आणि सहाय्य केंद्र तत्काळ सुरू करण्याची विनंती आयोगाला करण्यात आली आहे. चुकीची, अपूर्ण किंवा गोंधळाची यादी नागरिकांवर अन्याय करणारी ठरते. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व नागरिकांचा न्याय आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आयोगाने तात्काळ पावले उचलली पाहिजेत.
निवडणूक आयोगाने तंतोतंत आणि अगदी व्यवस्थित काम करून यादी बनवणे अपेक्षित होते; मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बनविलेल्या मतदार याद्यांत घोळ झाला असून, मतदार याद्या व्यवस्थित करण्याची मागणी आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केली. प्रारुप मदातर याद्यांमध्ये घोळ झाला, असा आरोप सत्ताधारी भाजपचे आमदार अमित गोरेखे यांनी केला आहे. निवडणूक आयोगाकडे वेळ कमी आहे, त्यांनी लवकरात लवकर या त्रुटी संपवाव्या, असे त्यांनी सांगितले. आमदार गोरखे म्हणाले की, पिंपरी विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील अनेक प्रभागांमध्ये दुबार नाव आली आहेत. अनेक प्रभागांमधल्या नावांची अदलाबदल झाली आहे; तसेच याद्यांत मोठ्या प्रमाणावर दुबार नाव दिसून येत आहेत. निवडणूक आयोगाने यावर व्यवस्थित काम करणे गरजेचे आहे. कारण हा मतदारांचा प्रश्न आहे आणि तो निवडणूक आयोगाने व्यवस्थित सोडवावा, असेही ते म्हणाले.