

नगर तालुका : नगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर आढळून आल्याने शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु वीज पूर्ण दाबाने मिळत नसल्याने विद्युत पंप चालतच नाहीत. त्यामुळे शेतकरी अक्षरशः वैतागले आहेत. पूर्ण दाबाने वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी वर्गांमधून होत आहे.
बिबटप्रवण क्षेत्रात शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जेऊर पट्ट्यात दोन टप्प्यांत शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध करून दिली जात आहे. परंतु वीज पूर्ण दाबाने मिळत नसल्याने विद्युत पंप चालण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. तसेच विजेच्या लपंडावामुळे शेतकरी वैतागले आहेत. वाफ्यात पाणी जाण्याअगोदरच वीज बंद होत असल्याने शेतकरी हेलपाटे मारून त्रस्त झाले आहेत.
रब्बी हंगामातील सर्वच पिकांना सद्यःस्थितीत पाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज देण्याचा निर्णय हा कागदोपत्रीच योग्य वाटत आहे. प्रत्यक्षात परिस्थिती मात्र खूपच विदारक आहे. पूर्ण दाबाने वीज मिळत नसल्याने वारंवार विद्युत पंप बंद होत आहेत. शेतीचे भरणे उरकत नाही. पाणी उपलब्ध असूनही विजेअभावी पिकाला पाणी देण्यास अडचण निर्माण झाली आहे.
विजेचा लपंडाव व कमी दाबामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. दिवसा वीज देण्याचा निर्णय चांगला असला, तरी विजेचा लपंडाव, तसेच कमी दाबाने होत असलेला वीजपुरवठा शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. विजेचा खेळखंडोबा सुरू असल्यामुळे पिके कोमेजण्यास सुरुवात झाली आहे.
वेळेवर पाणी न दिल्यामुळे पिके विविध रोगांच्या विळख्यात सापडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तरी शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज मिळण्याची मागणी होत आहे.
खरीप हंगाम अतिवृष्टीने वाया गेला. कांद्याला कवडीमोल भाव असल्याने त्यातही शेतकरी तोट्यात गेला. रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची गरज असताना विजेचा खेळखंडोबा सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पूर्ण दाबाने वीजपुरवठा सुरळीत करण्याची गरज आहे.
सूरज तोडमल, शेतकरी, जेऊर
शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज फक्त नावालाच देण्यात आली आहे. कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. त्यातच विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे वीजपंप चालू होत नसल्याने शेतकरी वैतागले आहेत. वाफ्यात पाणी जाण्याअगोदरच पंप बंद पडतात. विजेचा खेळखंडोबा सुरू असल्याने पिके जळून जाण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज मिळण्याची गरज आहे.
स्वप्नील तवले, शेतकरी, जेऊर