

कान्हूरपठार : पुणेवाडी (ता. पारनेर) येथील मल्ल चेतन रेपाळे यांनी उत्तर महाराष्ट्र केसरी स्पर्धेत बाजी मारत मानाचा किताब पटकावला.
पाथर्डी (जि. नाशिक) येथे पार पडलेल्या उत्तर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या स्पर्धेत रेपाळे यांनी उत्कृष्ट कौशल्य दाखविले.
या स्पर्धेत अनेक जिल्ह्यांतील नामांकित मल्लांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामन्यात धुळे येथील ॠषिकेश राजपूत यांच्याविरुद्ध चेतन रेपाळे मैदानात उतरले. सामन्याच्या सुरुवातीपासूनच त्यांनी आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व गाजवले. त्यांच्या या विजयामुळे पारनेरचा डंका संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात घुमला आहे. विजयी झाल्यानंतर रेपाळे यांना मानाची चांदीची गदा आणि 51 हजार रुपये पारितोषिक स्वरूपात देण्यात आले.
गावातील बाळासाहेब रेपाळे मित्र मंडळ व युवराज पठारे मित्र मंडळ व तालुक्यातील क्रीडाप्रेमींनी रेपाळे यास कुस्तीसाठी मोलाचे सहकार्य केले असून, रेपाळे यांच्या यशाबद्दल ग्रामस्थांसह कुस्तीशौकिनींनी अभिनंदन केले आहे.