

पाथर्डी: शासनाच्या तंबाखूविक्री संदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात पाथर्डी शहरात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण समितीच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत 23 दुकानदार व पानटपरी चालकांकडून 5600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या मोहिमेमुळे शहरातील तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण समितीच्या मागील बैठकीत दिलेल्या सूचनांनुसार ही कारवाई करण्यात आली. समितीचे अध्यक्ष तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन दरंदले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे यांच्यासह संबंधित पथकाने प्रजासत्ताकदिनी शहरात भागात तपासणी मोहीम हाती घेतली.
या मोहिमेदरम्यान तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, तसेच नियमांचे उल्लंघन आढळून आले. प्रारंभी समज व दंडात्मक कारवाई करण्यात आली. यानंतरही सुधारणा न झाल्यास संबंधितांविरुद्ध तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंध कायदा 2003 अंतर्गत थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा प्रशासनाने दिला.
विशेषतः शाळा व महाविद्यालयांच्या आवारात शंभर मीटरच्या आत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे हा कायद्याचा स्पष्ट भंग असल्याचे तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यांनी स्पष्ट केले. संबंधित विक्रेत्यांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा कारवाईचा बडगा उगारला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
या मोहिमेत पोलिस कर्मचारी साहेराव चव्हाण, बनकर, सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी राजेंद्र सावंत, तसेच स्थानिक युवक मंडळाचे प्रतिनिधी अमोल कांकरीया यांचा सहभाग होता. दरम्यान, उर्वरित शहर व तालुक्यात लवकरच छापेमारी करण्यात येणार आहे. ही मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे यांनी दिली.