

संगमनेर: ‘महावितरण’ कार्यालयात वीज बिल, वीज जोडणी, ट्रिपिंगसह अन्य तक्रारी घेऊन येणाऱ्या वीज ग्राहकांच्या समस्या समजून घ्या. वीज ग्राहकहित डोळ्यासमोर ठेवून तत्परतेने त्या सोडवा, असे सांगत प्रत्येक अधिकारी- कर्मचाऱ्यांनी वीज ग्राहकांशी सौजन्याने वागणे बंधनकारक आहे, असे सक्त निर्देश आमदार अमोल खताळ यांनी महावितरण अधिकाऱ्यांना केल्या.
संगमनेर शहरासह तालुक्यातील वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘महावितरण’च्या विभागीय कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत ते होते. यावेळी कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार, उपकार्यकारी अभियंता धनंजय खैरनार, उपकार्यकारी अभियंता प्रेमकुमार पाटील आदी उपस्थित होते.
संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज पुरवठा सुरु करावा, यासाठी संगमनेर विभागांतर्गत सर्व सौर उपकेंद्र कार्यान्वित करा, अशा सूचना त्यांनी ‘महावितरण’ अधिकाऱ्यांना दिल्या. निमोण वीज उपकेंद्र अंतर्गत कऱ्हे येथे कार्यान्वित केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होत आहे.
या पार्श्वभूमीवर पिंपरणे, तळेगाव, दिघे, चिंचोली गुरव, घारगाव, कोकणगाव, देवगाव व पोखरी हवेली या 9 गावांमध्ये सौर केंद्रांची कामे मंजूर केली आहेत. ती कामे संथ गतीने सुरू असल्यामुळे जलदगतीने पूर्ण करून, शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध करून द्या, अशा सक्त सूचना आमदार खताळ यांनी केल्या.
संगमनेर व निमज येथील नवीन उपकेंद्राच्या कामकाजाचा यावेळी आढावा घेण्यात आला. कोकणगाव, साकूर, हिवरगाव पावसा, निमोण, धांदरफळ, जवळे कडलग या उपकेंद्रात 10 मेगावॅटपर्यंत तसेच कर्जुले पठार, देवगाव, पिंपरणे, तळेगाव येथे 5 मेगावॅट क्षमतेपर्यंत वाढ केली आहे. याबाबत सविस्तर आढावा आमदार अमोल खताळ यांनी यावेळी घेतला.
संगमनेर तालुक्यातील नादुरुस्त रोहित्र तत्काळ कार्यान्वित करून शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा करा, अशा सूचना महावितरण अधिकाऱ्यांना केल्या आहेत. याशिवाय जिल्हा नियोजनमधून मंजूर केलेल्या सर्व कामांची प्रगती तपासून, ती कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्याबाबत स्पष्ट सूचना केल्या आहेत.
आमदार अमोल खताळ, संगमनेर.