

अहिल्यानगर शहरात पत्रकार म्हणून काम करीत असताना अनेक वेळा अजितदादांच्या सभा, पत्रकार परिषद कव्हर करण्याची संधी मिळाली. अनेक राजकारण्यांपैकी दादा अत्यंत स्पष्ट राजकारणी असल्याचा अनुभव आला. अनेक वेळा दादा आले की विविध संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते निवेदन घेऊन येत... पत्रकारांसमोर त्यांची निवेदने स्वीकारून काम होणार असेल तर पीएला सांगत... अन्यथा काम होणार नाही असे दादा स्पष्ट सांगायचे.
दैनिक पुढारीच्या अहिल्यानगर आवृत्तीचा 2024 मध्ये वर्धापन दिनाचा कार्यक्रम होता. वर्धापन दिनानिमित्त 22 जुलै रोजी स्नेहमेळावा आयोजित केलेला होता. नेमके त्याच दिवशी अजित दादा शहरात लाडक्या बहिणींशी संवाद साधण्यासाठी बंधन लॉन येथे येणार होते. आमदार संग्राम जगताप व राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दादांचे दौऱ्यांचे परफेक्ट नियोजन असते. वेळेला महत्त्व देणारे दादा वक्तशीर, शिस्तीचे चाहते. अशातच पुढारी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास दादा येणार आहेत, असे नगरचे ब्युरो चीफ संदीप रोडे यांचा निरोप मिळाला. मात्र, दादांच्या नियोजनात कार्यक्रम नसल्याचे सांगतानाच त्याचेही नियोजन झाले आहे, फक्त कार्यक्रमस्थळी त्यांना आणण्याची जबाबदारी तुझी असे निक्षून सांगितले. ‘पुढारी’च्या कार्यक्रमाला दादा येणार असल्यामुळे उत्साह दुणावला होता. सकाळपासून बंधन लॉनमध्ये ठाण मांडून बसलो होतो. त्या वेळी पहिल्यांदा गुलाबी जॅकेटमध्ये दादांना पाहिले. दादांनी तब्बल एक तास लाडक्या बहिणींशी मनमोकळा संवाद साधला.
कार्यक्रम संपल्यानंतर दादांनी नगरसेवक ॲड. धनंजय जाधव यांच्या घरी स्नेहभोजन घेतले. दादांना पुढारीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास नेण्यासाठी मी सतत आमदार संग्राम जगताप यांच्याकडे हट्ट धरला होता. दादा जेवणासाठी गेले, मी तिथेही आत गेलो. शेजारीच स्व. अरूणकाका बसलेले होते. दादांजवळ जात हळूच त्यांच्या कानात आपल्याला ‘पुढारी’ वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास जायचे आहे, असे सांगितले. त्यावर दादा म्हणाले, अरं बाबा आमदार संग्राम जगताप यांच्याकडून तुमचा निरोप आलाय माझ्याकडे.. जाऊ आपण, पण किती लांब आहे? मी म्हणलं दादा जवळच आहे.. जेवणानंतर दादा पटकन बाहेर पडले. स्व. अरुणकाका दादांच्या गाडीत बसले. तत्पूर्वीच ब्युरो चीफ संदीप रोडे यांना आ. संग्राम जगताप यांनी ‘दादा तुमच्याकडे येण्यास निघाले’ असा निरोप दिला होता. अरुणकाकांनी दादांना थेट ‘पुढारी’ वर्धापन दिन सोहळ्यास आणले. त्यापूर्वीच मी मोटारसायकलवर कोहिनूर मंगल कार्यालय गाठले. नेहमीप्रमाणे माईक हातात घेऊन दादांचे जोरदार स्वागत केले.
दादा... व्यासपीठावर आल्यानंतर मी महाकवी वामन दादांचे तुफानातील दिवे आम्ही... तुफानातील दिवे हे गीत गायले. त्यावर दादा हसले अन् म्हणाले आपण सगळेच तुफानातील दिवे आहेत. अशा परखड, स्पष्ट आणि सत्तेतून समाजाच हित साधणारा भला माणूस म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार.
दादांचा त्या दिवशी वाढदिवस पण त्यांनी साधेपणाने बुके स्वीकारत शुभेच्छाचा स्वीकार केला. ‘द व्हाईस’ या विशेषांकाचे प्रकाशन करत त्यामागील संकल्पना समजून घेतली. जिल्ह्याच्या विकासात योगदान देणाऱ्यांच्या यशोगाथा ‘पुढारी’ने प्रकाशित केल्याचे समजताच त्यांनी तो विशेषांक गाडीत ठेवण्यास सांगितला. ‘पुढारी’ परिवाराला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत ते श्रीगोंद्याच्या कार्यक्रमास निघाले.
डॉ. सूर्यकांत वरकड
जीवापाड प्रेम करणारे दादा..
नियोजनात नसतानाही अजित दादा हे अरुणकाका आणि आ. संग्राम जगताप यांच्या आग्रहाखातर ‘पुढारी’च्या कार्यक्रमास आले. खरे तर अजित दादा अत्यंत शिस्तप्रिय, स्पष्टोक्ते. पण पत्रकारांवरही त्यांचा जीव असायचा. नगरचे ब्युरो चीफ संदीप रोडे यांची विनंती आणि आ. जगताप यांचा आग्रह दादा नाकारू शकले नाहीत. त्यावेळी पत्रकार, कार्यकर्ता अथवा कोणी असो, त्यांच्यावर प्रेम करणारे दादा त्या दिवशी दिसले, भावले. माणूस म्हणून एखाद्यावर जीवापाड प्रेम करणारे दादा त्या दिवशी आम्ही अनुभवले.