

नेवासा: पाणीपुरवठा व स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या बैठकीवरून नेवासा नगरपंचायतीमध्ये मंगळवारी (दि. 27) दिवसभर कलगीतुरा रंगला. प्रथम अस्वच्छतेचा आरोप करीत उपनगराध्यक्ष शालिनी सुखदान यांनी नगरपंचायत कार्यालयासमोर मंडप टाकून कार्यलय थाटले. बुधवारी नगराध्यक्ष ड़ॉ. करणसिंह घुले यांनीही कार्यालयासमोर मंडपातच कामकाज सुरू केले. त्यामुळे नेवासा नगरपंचायतीचा कारभार सध्या रस्त्यावर सुरू झाला आहे.
दरम्यान, नगराध्यक्ष कार्यालयात धुडगूस घातल्याप्रकरणी नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांनी नेवासा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा उपनगराध्यक्षा शालिनी सुखदान, आम आदमीचे नेते संजय सुखदान व क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या नगरसेविकांसह 10 ते 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी 11 वाजता उपनगराध्यक्षा शालिनी सुखदान यांच्या दालनात नेवासा नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक बोलावण्यात आली होती. मात्र,उपनगराध्यक्ष व नगरसेवक बैठकीसाठी उपस्थित झाल्यानंतर उपनगराध्यक्षांच्या दालनाची कोणत्याही प्रकारची स्वच्छता करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले.
बैठकीला संबंधित अधिकारी व कर्मचारीही गैरहजर होते. विशेष बाब म्हणजे नगराध्यक्षांचे दालन पूर्णतः स्वच्छ करण्यात आले होते. त्यामुळे प्रशासनाकडून जाणीवपूर्वक भेदभाव केला जात असल्याचा आरोप उपनगराध्यक्षा शालीनी सुखदान यांनी केला. प्रशासन कोणाच्या तरी दबावाखाली काम करीत असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. जोपर्यंत नेवासा नगरपंचायत प्रशासनाकडून प्रशासकीय इमारतीची संपूर्ण स्वच्छता केली जात नाही आणि बैठकीस अनुपस्थित व निष्क्रिय कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत नगरपंचायत आवारातूनच कारभार करणार असल्याचे उपनगराध्यक्षा सुखदान यांनी स्पष्ट केले. नगरपंचायतीत बेकायदा कृत्य व गैरकायद्याचा जमाव जमवून झुंडशाही करणाऱ्या व नगराध्यक्षांचे दालन बळकावणाऱ्या नगरसेवकांवर तसेच जमावावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी नगराध्यक्ष करणसिंह घुले व महायुतीच्या नगरसेवकांनी कार्यालयीन अधीक्षक सागर झावरे यांना निवेदन दिले.
नगराध्यक्ष दालनाचा बळजबरीने ताबा
उपनगराध्यक्षा, नगरसेवक, तसेच आठ, दहा जणांनी बळजबरीने नगराध्यक्ष दालनाचा ताबा घेतला. घुले व त्यांच्या सहकाऱ्यांना दमदाटी करून बाहेर काढले. नगराध्यक्षांची खूर्ची बाहेर फेकली. कागदपत्रे फेकली. नगराध्यक्ष या नावाची पाटी शालिनी सुखदान यांनी काढून फेकली. माझ्या जागेचा अनधिकृत ताबा घेऊन दांडगाई केली. तसेच नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना हाकलून दिल्याबद्दल फौजदारी व प्रशासकीय कारवाई करावी. तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून नगरपंचायतीसमोरील रस्त्यावर बसून कामकाज सुरु ठेवणार असल्याचे नगराध्यक्ष डॉ करणसिंह घुले स्पष्ट केले.
यांच्याविरुद्ध झाला गुन्हा दाखल
उपनगराध्यक्षा शालिनी सुखदान, संजय सुखदान, जालिंदर गवळी, राजू काळे, आसिफ पठाण, जयश्री शिंदे, दिनेश व्यवहारे, सोनल चव्हाण, अजय त्रिभुवन, उमेश इंगळे, जितेंद्र कुऱ्हे, अनिल शिंदे, स्वप्निल मापारी, धनू काळे, अनिकेत मापारी, संभाजी धोत्रे, जयदीप जामदार व इतर आठ-दहाजणांनी बळजबरीने दालनाचा ताबा घेतला. या प्रकरणी डॉ. घुले यांच्या तक्रारीवरून पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक मनोज अहिरे तपास करीत आहेत.
पाणीपुरवठा आणि जनहितार्थ विषयांवर बैठकीसाठी गेलो असता, तेथे कमालीची अस्वच्छता होती. जबाबदार अधिकारी गैरहजर होते. हा लोकप्रतिनिधींचा, जनतेचा अपमान आहे. प्रशासकीय निष्क्रियतेचा निषेध म्हणून खुले कार्यालय सुरू केले. आमचा हेतू केवळ नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा आहे.
शालिनी सुखदान, उपनगराध्यक्ष, नेवासा