

करंजी: पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे अनेक दिवसांपासून सुरू असलेले कत्तलखाने सोमवारी (दि. 4) पोलिस बंदोबस्तात भुईसपाट करण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. तिसगाव येथे गोवंशची हत्या केली जात असल्याचे पोलिस कारवाईत सातत्याने पुढे आले आहे. हिंदू समाज बांधवांच्या भावना लक्षात घेता तिसगाव येथे दोन समाजांत तेढ निर्माण होऊ नये, म्हणून तेथील येथील कत्तलखाने भुईसपाट करण्याची भूमिका ग्रामपंचायतीने घेतली. यासंदर्भात ग्रामपंचायतीने पोलिस, पंचायत समिती, तहसीलदारांना शनिवारी निवेदन दिले. तसेच तिसगाव येथील कत्तलखाने कायमस्वरूपी बंद व्हावेत, यासाठी तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री स्वतः उपोषणास बसणार असल्याची कुणकुण प्रशासनाला लागली.
आदिनाथ महाराज शास्त्री या कत्तलखान्याविरोधात उपोषणाला बसले, तर तालुकाच नव्हे, तर जिल्ह्यात वेगळं चित्र निर्माण होऊ शकतं. त्यामुळे प्रशासनाने गंभीर दखल घेत सोमवारी तिसगाव येथील सर्व अनधिकृत कत्तलखाने जमीनदोस्त करण्यास मदत केली. सोमवारी सकाळी ग्रामपंचायीत कार्यालयात गटविकास अधिकारी संगीता पालवे, पोलिस उपनिरीक्षक विलास जाधव, संदीप ढाकणे, माजी सभापती काशिनाथ पाटील लवांडे, सरपंच इलियास शेख, उपसरपंच पंकज मगर, सुनील परदेशी यांच्यासह सर्व पदाधिकारी व कुरेशी कुटुंबाची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी लवांडे म्हणाले, महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांना आम्ही
सर्वजण दैवत मानत असल्याने तिसगावच्या कत्तलखान्याविरोधात साधू-संतांना जर उपोषणाला बसण्याची वेळ येत असेल, तर ही बाब तिसगावकरांच्या दृष्टीने निश्चितच चांगली नाही. त्यांच्यासोबत आम्हीसुद्धा उपोषणाला बसू. गोहत्या बंदी कायदा असताना कोणी आता कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला आणि तिसगावला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, तर यापुढे ते कृत्य कदापि खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा दिला. तिसगाव येथील अनधिकृत कत्तलखाने जमीनदोस्त करण्यासाठी तिसगावचे उपसरपंच पंकज मगर, गोरक्षक मुकुंद गर्जे, भय्या बोरुडे यांनी निवेदनाद्वारे पोलिस बंदोबस्ताची मागणी केली होती. पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी सोमवारी मोठा पोलीस बंदोबस्त दिल्याने गटविकास अधिकारी संगीता पालवे यांच्या उपस्थितीत सर्व कत्तलखाने भुईसपाट करण्यात आले. येथील कत्तलखाने कायमस्वरूपी बंद करण्याचा शब्द या बैठकीत संबंधित कुरेशी कुटुंबाकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.
यावेळी सरपंच इलियास शेख, सुनील परदेशी, युवानेते भैया बोरुडे, गणेश भोसले, राम काळे, गणेश शिंदे, रोहित खंदारे, मयूर कुरे,अक्षय जायभाय, विजय ससाणे, अक्षय भुजबळ ,दीपक गरुड, शिवम आठरे, प्रवीण परदेशी, रॉबिन पाथरे, प्रशांत लवांडे, ग्रामविकास अधिकारी गणेश ढाकणे यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा या कारवाई प्रसंगी तैनात होता.
कोणीही मदत करणार नाही
कत्तलखान्यांमुळे तिसगावची बदणामी होत असेल, दोन समाजांत तणाव निर्माण होत असेल आणि महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांना उपोषणाला बसण्याची वेळ येत असेल, तर तिसगाव मध्ये पुन्हा गोहत्या करण्याचा प्रयत्न झाला, तर त्या संबंधित कुटुंबांना कायमचे गावाबाहेर काढले जाईल, त्यांच्या मदतीला कोणीही तिसगावमधून येणार नाही त्यांना कायमचा धडा शिकविला जाईल, अशी ठाम भूमिका माजी सभापती काशिनाथ पाटील लवांडे यांनी यावेळी घेतली.
भोंग्यांचा आवाजही होणार कमी
तिसगाव येथे धार्मिक प्रार्थनेनिमित्त सातत्याने मोठा आवाज राहतो, या आवाजामुळे शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी तसेच शाळेच्या वेळेत देखील शिक्षकांना शिकविण्यासाठी मोठा व्यत्यय येतो. त्यामुळे प्रार्थनेवेळीचा आवाज मर्यादित ठेवण्याचे आवाहन पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी व उपसरपंच पंकज मगर यांनी बैठकीत केले.
..तर मकोका अंतर्गत कारवाई
तिसगावमध्ये बाथरूम, बेडरूममध्ये गोमांस लपवून ठेवल्याचे पोलिस कारवाईत आढळून आले आहे. यापुढे गोवंशहत्या करणाऱ्या आरोपीला थेट तुरुंगात टाकले जाईल. वारंवार असे गुन्हे आरोपीकडून घडल्यास त्याच्यावर मकोका अंतर्गत मोठी कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिस उपनिरीक्षक संदीप ढाकणे यांनी यावेळी दिला.