

नगर : मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजनतून पूर्ण झालेल्या कामाचे मोजमाप करून, त्याचे बिल मंजुरीकरिता पाठविण्यासाठी 65600 रुपयांच्या लाचेच्या प्रकरणात रोजगार हमीच्या दोघांसह एक ‘बांधकाम’ उपअभियंता, अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारनेर तालुक्यातील कारेगाव ते वाघोबा रस्ता खडीकरण व मजबुतीकरणाचे एका फर्मला काम मिळाले होते. कामाचे मोजमाप होऊन बिले तयार करून ते मंज़ुरी करता पाठविण्याचे काम रोजगार हमी योजनेचे पॅनल तांत्रिक अधिकारी विलास चौधरी, तांत्रिक सहायक दिनकर मगर, पंचायत समितीचे उपअभियंता अजय जगदाळे यांच्याकडे होते.
यातील विलास चौधरी यांनी बील मंजुरीसाठी पाठविण्याकरिता स्वतःसह अजय जगदाळे व इतर तिघांकरिता असे सर्वांचे मिळून 65,600 रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे संबंधित फर्मच्या इसमाने नगरच्या लाचलुचपत विभागाकडे याबाबत तक्रार केली होती. त्यानुसार, दि.18 रोजी पंचासमक्ष लाचेची मागणी पडताळणी करण्यात आली. यावेळी विलास चौधरी याने पंचासमक्ष बिले मंजुरीसाठी पाठविण्याकरीता 65,600 रुपयांच्या लाचेची मागणी करत ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली.
त्यानंत्तर दि. 20 रोजी लाचलुचपत विभागाने सापळा लावून पारनेर पंचायत समिती कार्यालयात विलास चौधरी यांनी स्वतःकरिता, अजय जगदाळे यांच्याकरिता तसेच दिनकर मगर यांच्याकरवी पंचासमक्ष 65600 रुपयांची लाच स्वीकारली. संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनात पो.हे.कॉ. संतोष शिंदे, रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, हारूण शेख आदींनी केली. या कारवाईने जिल्हा परिषदेच्या वर्तूळातही खळबळ उडाली आहे.