

देवळाली प्रवरा/राहुरी: जिथे जन्म झाला, जिथे पोहायचे शिकले, जिथे वडाच्या पारंब्यांना झोके घेतले, जिथे सवंगड्यांसोबत विटी-दांडू, क्रिकेट खेळले, ते मामाचे गाव देवळाली प्रवरा अजितदादांच्या निधनाने आज पोरके झाले. आजोळ असलेल्या देवळालीत अजितदादांचे नेहमी येणे-जाणे. मामाच्या म्हणजे मामेभाऊ माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या कुटुंबाशी तर नातेच रक्ताचे; पण जणू साऱ्या गावाचेच ते भाचे असल्याचा अभिमान बाळगावा, इतके अजितदादांचे नाते देवळाली प्रवराशी घट्ट होते. या लाडक्या भाच्याच्या निधनाने अख्खी देवळाली आज शोकसागरात बुडाली...
अजितदादाच्या निधनाची बातमी कळताच त्यांच्या आजोळी देवळाली प्रवरा येथील दादांचे मामेभाऊ माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या निवासस्थानी सकाळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. चंद्रशेखर कदम यांना अश्रू आवरणे मुश्किल झाले. त्याबरोबर उपस्थित नागरिकांनीही अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
देवळाली प्रवरा हे अजित दादांचे आजोळ. याच गावात दादांचा जन्म झाला. स्व. अण्णासाहेब पाटील कदम., स्व. मुकुंदराव पाटील कदम, स्व. सर्जेराव पाटील कदम, स्व. शरदचंद्र पाटील कदम हे अजितदादांचे चार मामांचे प्रस्थ शहरात आहे. देवळाली प्रवराच्या मातीशी अजितदादांची नाळ कधीच तुटली नाही. शासकीय लवाजमा बाजूला ठेवून कधीही ते यायचे, सवंगड्यांशी गप्पा मारायचे. राजकीय नेते असले तरी दादा खऱ्या अर्थाने ‘आजोळचे दादा’ होते. आज त्यांच्या जाण्याने आजोळ पोरके झाले, अशा भावना व्यक्त करताना गाव बंद करत देवळाली प्रवरेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
तीन महिन्यांपूर्वी दादा देवळाली प्रवराला आले, तेव्हा खंडोबा यात्रेतील गमती, अण्णासाहेबांच्या वस्तीवरील विहिरीत पोहणारे दादा, अण्णासाहेबांच्या वाड्यासमोर वडाखाली खेळणाऱ्या दादांच्या सवंगड्यांना आठवणी सांगताना अश्रू अनावर झाले होते. गोट्या, विटी-दांडू, क्रिकेट, विहिरीत पोहणे, बाजारात फिरणे, भेळ व खाऊ खाणे यासारख्या साध्या पण गोड आठवणी प्रत्येकाला अस्वस्थ करून गेल्या. सुटी लागली की बारामतीहून देवळाली प्रवरा गाठणे, मामांच्या घरी मुक्काम, मित्रांसोबत खेळणे, हे दादांसोबत घालवलेले क्षण अनेकांसाठी अविस्मरणीय होते. गावात आले की दादा राजकारण बाजूला ठेवून नातेसंबंधांना प्राधान्य देत. सर्व मामेभावंडांच्या कुटुंबीयांची भेट, आपुलकीने चौकशी, घरगुती संवाद साधताना त्यातून त्यांचा देवळालीचा जिव्हाळा दिसून येत असे. गावात आले की ‘व्हीआयपी’ म्हणून नव्हे, तर आपल्या माणसांमध्ये मिसळणारे दादा म्हणून ते वावरत. राष्ट्रीय व राज्य पातळीवर नेतृत्व करणारे अजितदादा केवळ राजकीय नेते नव्हते, तर देवळाली प्रवरा गावासाठी ते आपुलकीचे ‘आजोळचे दादा’ होते.
देवळाली प्रवरा व राहुरी तालुक्यासाठी अजितदादांनी वेळोवेळी विकासकामांना हातभार लावला. पायाभूत सुविधा, सहकार क्षेत्र, स्थानिक प्रश्नांसाठी त्यांनी नेहमी सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे देवळाली प्रवरा गावासाठी ते केवळ राजकीय नेते नव्हते, तर घरचा माणूस होते.
मामेभाऊ चंद्रशेखर कदम यांना अश्रू अनावर
अजितदादांचे मामेभाऊ, माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या निवासस्थानी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दादांच्या आठवणी सांगताना कदम यांना हुंदका आवरत नव्हता. ते म्हणाले, की माझ्यापेक्षा वयाने लहान पण कर्माने मोठे असलेले अजितदादा जाणे हे मोठे दुर्दैव आहे. माझी आमदारकी दादांमुळे खुलून आली. त्यांनी राहुरी तालुका आणि विशेषतः देवळाली प्रवरासाठी नेहमी भरभरून मदत केली. मी त्यांच्या पक्षात नव्हतो, तरी कधीच कोणत्याच कामाला कधी नाही म्हणाले नाही. तीन महिन्यांपूर्वी खास मला भेटण्यासाठी देवळाली प्रवराला आले होते. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रासह पवार, कदम कुटुंब आणि देवळाली शहराची मोठी हानी झाली आहे.
अजितदादांच्या अपघाताची आणि निधनाची बातमी समजताच देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, अजित कदम, अशोक कदम, अमित कदम, सुनील कदम, शैलेंद्र कदम यांच्यासह कदम परिवारातील सदस्य तातडीने बारामतीकडे रवाना झाले. गावकऱ्यांनी बंद पाळून मेणबत्त्या पेटवून, प्रार्थना करत दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
रियाज देशमुख