

कोळपेवाडी: गाळप हंगाम 2024-25 वर्षाकरीता साखर उत्पादन प्रक्रियेत उत्कृष्ट तांत्रिक नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व उच्च कार्यक्षमतेचे निकष यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याला मध्य विभागातून तांत्रिक कार्यक्षमता प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे यांनी दिली.
साखर उद्योगातील शिखर संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी (पुणे) यांच्यातर्फे राज्यामध्ये दरवर्षी उत्तम कामगिरी करणाऱ्या साखर कारखान्यांना पुरस्कार तर, राज्यामध्ये उसाचे सर्वाधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा ‘ऊस भूषण पुरस्कार’ देवून गौरविण्यात येते. 2024-25 च्या गळीत हंगामात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या राज्यातील अन्य साखर कारखान्यांना विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
प्रथम क्रमांकाच्या तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कारासाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची निवड झाली आहे, ही बाब विशेष उल्लेखनिय आहे. काळे कारखान्यास गेल्यावर्षी 2023-24 च्या गळीत हंगामात मध्य विभागातून दुसऱ्या क्रमांकाचा तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार मिळाला होता. यंदा कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करून, अधिक तांत्रिक कार्यक्षमतेचा वापर करीत, काळे कारखान्याने मध्य विभागात तांत्रिक कार्यक्षमतेचे प्रथम पुरस्कार पटकाविला आहे.
काळे कारखान्याने मिलमधील उसाचा तंतुमय निर्देशांक-86.6%, रिड्यूस्ड मिल एक्स्ट्रॅक्शन-96.16, प्रायमरी एक्सट्रॅक्शन-73.9, बगॅस बचत, % ऊस-8. 77%, गाळप क्षमतेच्या वापरामध्ये वाढ, 8.12%, बगॅस मधील साखरेचे व्येय प्रमाण-0.52, गाळप बंद काळाचे प्रमाण (मेकॅनिकल ॲन्ड इलेक्ट्रिकल)-0.0%, पाण्याचा वापर % फायबर 261.99, साखर उतारा 11.20% मिळाला. यासर्व कामगिरीची दखल घेवून, 2024-25 सालच्या गळीत हंगामासाठी मध्य विभागातून प्रथम क्रमांकाच्या तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कारासाठी कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याची निवड करण्यात आली आहे.
पुरस्कार वितरण सोहळा सोमवार (दि.29) रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे आदींच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
स्व.कर्मवीर काळे यांचे, काटकसरी व्यवस्थापन व नियोजन डोळ्यासमोर ठेवून काळे कारखान्याचे आधारस्तंभ, ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रगती करीत आहे. उत्पादन खर्चात बचत करून, ऊस उत्पादकांना जास्त दर कसा देता येईल, असा विचार करुन, यावर अंमलबजावणी केली जात आहे. कारखान्याचे दोन टप्प्यात विस्तारीकरण व आधुनिकीकरण करून, पूर्ण क्षमतेने गाळप होत आहे. गाळप करताना साखरेचा कमी अपव्यय, बगॅस बचत, स्टीमचा कमी वापर, साखरेचा उत्तम दर्जा या बाबींचा अवलंब करून, कारभार काटेकोर सुरु आहे. कारखान्याला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार हा सभासद, ऊस उत्पादक संचालक व कर्मचाऱ्यांचा सन्मान आहे.
आमदार आशुतोष काळे, चेअरमन, कर्मविर काळे साखर कारखाना, कोळपेवाडी