

श्रीगोंदा: श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत भाजपने 22 पैकी 13 जागा जिंकत जोरदार मुसंडी मारली. आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी आपले कसब दाखवत पुन्हा एकदा नेतृत्व सिद्ध केले आहे. नगरपालिका निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच चार पॅनल रिंगणात उतरले होते. मात्र प्रत्यक्षात ही निवडणूक भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे) अशी दुरंगी झाली. कुठलाही गाजावाजा न करता सर्वच नेत्यांनी निवडणूक अत्यंत शांततेत पुढे नेली. या निवडणुकीत अजित पवार गटाचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. तालुक्यात एवढे बडे नेते असताना पालिकेत एकही नगरसेवक निवडून न आणता आल्याने नेत्यांची पुरती नाचक्की झाली आहे. महाविकास आघाडीची ही यापेक्षा वेगळी अवस्था नाही.
ही निवडणूक मनोहर पोटे विरुद्ध भाजप अशीच रंगली. पोटे यांनी एकाकी झुंज दिली; मात्र त्यांना अपयश आले. तुलनेत आमदार विक्रम पाचपुते यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स ठेवला होता. शेवटच्या टप्प्यात सुनीता खेतमाळीस यांना उमेदवारी देत सर्वांनाच धक्का दिला. पोटे यांना सुरुवातीला सोपी वाटणारी निवडणूक अंतिम टप्प्यात कसोटीची ठरली. आमदार पाचपुते यांनी निवडणुकीवर बारकाईने लक्ष ठेवत अडचणीच्या ठिकाणी स्वतः जाऊन वाटाघाटी केल्या. परिणामी सुनीता खेतमाळीस या विजयापर्यंत जाऊन पोहोचल्या.
सर्वाधिक मताधिक्य घेतलेले पहिले तीन उमेदवार
1) प्रशांत गोरे - 831 मतांनी विजयी
2) बंटी बोरुडे - 710 मतांनी विजयी
3) सोनाली सागर गोरे - 689 मतांनी विजयी
सर्वांत कमी मतांनी विजयी उमेदवार
1) राजेंद्र खेडकर - 1 मताने विजयी
2) पल्लवी पांडुरंग पोटे - 8 मतांनी विजयी
3) दीपाली बोरुडे - 9 मतांनी विजयी
विद्यमान नगराध्यक्ष व आठ नगरसेवकांचा पराभव
नगरपालिका निवडणुकीत भाजपचे 5 नगरसेवक- छायाताई गोरे, अशोक खेंडके, अंबादास औटी, नंदकुमार लढाणे, सतीश मखरे; शिंदे गटाचे राजाभाऊ लोखंडे, मनोहर पोटे (प्रभाग 3 व प्रभाग 7 मध्ये) दोन्ही जागांवर धक्कादायक पराभव),सेच ज्योती खेडकर आणि नगराध्यक्ष शुभांगी पोटे यांचा या निवडणुकीत पराभव झाला. विद्यमान 19 नगरसेवकांपैकी दोनच नगरसेवकांची म्हणजे सुनीता खेतमाळीस (नगराध्यक्ष) व शहाजी खेतमाळीस पुन्हा पालिकेत एन्ट्री झाली आहे.
जनतेचा कौल मान्य
शिवसेना शिंदे गटाचे नेते मनोहर पोटे म्हणाले, की जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. शहराच्या विकासासाठी यापूर्वीही आम्ही कटिबद्ध होतो, उद्याही राहू. निकाल मान्य करून आम्ही पुन्हा जनतेच्या कामासाठी बाहेर पडणार आहोत.
सुनीता खेतमाळीस दुसऱ्यांदा नगराध्यक्ष
सुनीता खेतमाळीस यांचे पती संतोष खेतमाळीस यांचा शहरात मोठा जनसंपर्क होता. 2011 ला सुनीता खेतमाळीस या नगराध्यक्ष झाल्या होत्या. त्यानंतर पुन्हा 2025 मध्ये त्यांना नगराध्यक्षपदी विराजमान होण्याची संधी मिळाली.