

अमोल गव्हाणे
श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत भाजपने नगराध्यक्षपदासह चौदा जागांवर विजय मिळवत आपला गड भक्कम केला आहे, तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये अनेक मातब्बर नेते असताना त्यांना एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीचे या निवडणुकीत पुरते पानिपत झाले आहे. आमदार विक्रम पाचपुते यांनी विरोधकामधील बेकीचा फायदा घेत पालिकेची सत्ता काबीज केली.
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्यापासूनच शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले होते. माजी आमदार राहुल जगताप, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, घनश्याम शेलार, बाळासाहेब नाहाटा, अण्णासाहेब शेलार हे मातब्बर नेते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत.नगरपालिकेला अध्यक्षपदाची उमेदवारी कुणाला द्यायची यावरून अनेक दिवस खल सुरू होता. राहुल जगताप वगळता अन्य नेत्यांचा शुभांगी पोटे यांच्या उमेदवारीला विरोध होता. दुसरीकडे ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांच्या स्नुषा गौरी भोस यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी काही नेत्यांची भूमिका होती, याला माजी आमदार राहुल जगताप यांचा विरोध होता. नेत्यांच्या बेबनावात मनोहर पोटे यांनी स्वतःचा पॅनल तयार केला. राष्ट्रवादीकडून विजयी होणाऱ्या उमेदवारांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली. अर्थात त्याला राहुल जगताप यांनी रसद पुरवली. पोटे यांनी स्वतःचा पॅनल तयार करताच राष्ट्रवादीने ज्योती खेडकर यांची उमेदवारी जाहीर केली. सगळे नेते एकत्र असताना त्यांचा दारूण झालेला पराभव नक्कीच धक्कादायक आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत माहिती एका नेत्याने भाजपच्या नेत्यांना पुरवली, असाही आता आरोप होतो आहे. तो नेता कोण या विषयी आता चर्चा रंगू लागली आहे. इतका मोठ्या पराभवाची कारणमीमांसा करताना हे नेते एकमेकावर खापर फोडतील यात नवल वाटायला नको.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला एकही नगरसेवक निवडून का आला नाही? असा प्रश्न नेत्यांना विचारला तर हे नेते काय उत्तर देतील, याचीही आता खुबीने चर्चा सुरू आहे. असे असले तरी शिवसेनेच्या निवडून आलेल्या नऊ नगरसेवकापैकी बहुतांश नगरसेवक हे माजी आमदार राहुल जगताप यांना मानणारे आहेत. दुसरीकडे भाजपने सावध पवित्रा घेत शेवटच्या टप्प्यात सुनीता खेतमाळीस यांना उमेदवारी देण्यात आली. आमदार विक्रम पाचपुते यांनी सुरुवातीपासूनच ही निवडणूक एकहाती सांभाळत प्रत्येक बारीकसारीक बाबींवर बारकाईने लक्ष ठेवले. त्याचा परिणाम विजयात झाला. आमदार पाचपुते यांनी पालिका निवडणुकीतील आपले मनसुबे अतिशय गुप्त पद्धतीने यशस्वी केले, असेच म्हणावे लागेल. सुरुवातीला भाजपविरोधी वाटणारी निवडणूक शेवटच्या टप्प्यात आपल्याकडे खेचण्यात पाचपुते यशस्वी झाले. या निवडणुकीतील सर्वांत महत्त्वाची अन् नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे मुस्लिम मते वळविण्यात आमदार पाचपुते यांना बऱ्यापैकी यश आले अन् आजचा भाजपचा विजय हा त्याचाच परिपाक म्हणावा लागेल. विधानसभा निवडणुकीनंतर झालेली निवडणूक यशस्वी पार पाडण्यात आमदार विक्रम पाचपुते यशस्वी झाले.
गौरी भोस यांची उमेदवारी टिकणार नाही हे माहीत असताना केवळ मनोहर पोटे यांना विरोध करण्यासाठी ही उमेदवारी झाली. निकाल हाती आल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेेदवार गौरी भोस यांचा झालेला पराभव बाबासाहेब भोस यांच्या राजकारणाला घरघर लागल्याचे संकेत म्हणावा लागेल. पोटे यांच्या पराभवासाठी मैदानात उतरलेले भोस यांचा इतका धक्कादायक पराभव कार्यकर्त्यांचा चांगलाच जिव्हारी लागला आहे. मनोहर पोटे यांनी निवडणुकीत सुरुवातीपासूनच ‘एकला चालो रे’ची भूमिका घेतली. शुभांगी पोटे या गेल्या पाच वर्षातील केलेल्या कामाच्या जोरावर या निवडणुकीला सामोरे गेल्या मनोहर पोटे यांनी दोन ठिकाणाहून उमेदवारी केली. मात्र तिन्ही ठिकाणी शहरातील जनतेने पोटे दांपत्यास नाकारले. राजकीय कुरघोडीत त्यांचा पराभव झाला. राजकीय बलाढ्य शक्तीपुढे पोटे यांनी दिलेली लढत दखल घेण्यासारखी आहे.
तरीही जगताप प्लसमध्ये
शिंदे सेनेकडून निवडून आलेले बहुतांश नगरसेवक हे माजी आमदार राहुल जगताप यांना मानणारे आहेत. विधानसभा निवडणुकीत ते जगताप यांच्या सोबत होते. नगरपालिका निवडणुकीत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचा सुफडा साफ झाला असला तरी राहुल जगताप यांचा गट प्लसमध्ये आहे.