

नेवासा: नेवासा नगरपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. नगराध्यक्षपद खुले असल्याने निश्चितच नगरसेवकापेक्षा नगराध्यक्ष पदाकडेच अनेकांचे लक्ष लागले आहे. सुप्तपणे इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. निवडणूक तारखा जाहीर झाल्याने हालचाली गतिमान झाल्या आहेत. शहराचा विकास सर्वांच्या डोळ्यासमोर असल्याने आता नेवासेकर नव्या चेहऱ्याच्या शोधात असल्याचे जाणकार सांगत आहेत. (Latest Ahilyanagar News)
नेवासे ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली. पंचवार्षिक निवडणूक होऊन तीन वर्षांचा प्रशासकांचा कालावधी झालेला आहे. प्रारंभी पंचवार्षिक निवडणुकीच्या काळात नेवासेकरांनी गडाख गटाला बहुमत देऊन नगराध्यक्षपद भाजपला दिले होते. अडीच वर्षांनंतर नगराध्यक्षपद गडाख गटाकडे आले होते. तसेच प्रशासकांच्या कालावधीत नेवाशात काय दिवे लागले व कोणता विकास झालेला आहे हे जगजाहीर आहे.
नेवासे बाजार तळावरील व्यापारी संकुलाच्या रूपाने काही प्रमाणात शहरात विकास गंगा सुरू होत नाही तोच ब्रेक लागल्याने विकासाचा पाया खचला गेला आहे. पाणीपट्टी, नळपट्टी मोठ्या प्रमाणात वाढली गेली आहे. मालमत्ता सर्व्हेचे तीनतेरा बाजले आहेत. नगरपंचायतीला अनेक दिवसांपासून सारथीच नसल्याने विकासकामे तर खुंटलीच आहे; परंतु सामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास आहे त्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सवड नसल्याचा सूर मोठ्या प्रमाणात निघत आहे. मध्यंतरी शहरातील अतिक्रमणे हटविण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या; परंतु शहरातील ठिकठिकाणी झालेल्या अतिक्रमणांचा विळखा हटविण्यात नगरपंचायतीला अपयश आलेले आहे.
गेल्या वर्षीच नगरपंचायतीची निवडणूक होणार असल्याच्या चर्चेने काही दिवस इच्छुकांनी हालचाली सुरू केल्या होत्या. जेवणावळीही झाल्या. विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आपणच नेवाशाचे कैवारी असल्यागत नागरिकांचे भिजत पडलेले प्रश्न घेऊन मोर्चे, आंदोलने केली होती. पुन्हा निवडणूक लांबल्याने वातावरण जैसे थे झाले होते. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नगरपंचायत निवडणूक होणार आहे.
निवडणूक तारखा जाहीर झाल्या आहेत. २ डिसेंबरला मतदान होणार आहे. नगरसेवकांसह नगराध्यक्ष पदाकडेच अनेकांचे लक्ष लागलेले आहे. त्यामुळे इच्छुकांनी सुप्तपणे मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मेळावे, बैठका सुरू झाल्या आहेत. आकडेमोड सुरू झाली आहे. इच्छुकांनी गाठीभेटी सुरू केल्या आहेत. नागरिकही सध्या मूग गिळून आहेत. काम करणारा नगरसेवक व नगराध्यक्ष हवा असल्याने नेवासेकर नव्या चेहऱ्याच्या शोधात आहेत.
तावून सुलाखूनच जनता निर्णय घेणार !
आजपर्यंत नेवाशाच्या विकासावरच राजकारण झालेले आहे. काय विकास झालेला आहे हे सर्वांसमोर दिसत आहे. नगरपंचायतपेक्षा ग्रामपंचायतच बरी होती अशीच आरोळी अनेक दिवसांपासून सर्वसामान्यांतून होत आलेली आहे. नेवासेकरांनी सर्वांची पारख केलेली असल्याने या निवडणुकीत नगराध्यक्ष व नगरसेवकांचा कस लागणार आहे. तावून सुलाखूनच जनता निर्णय घेणार असल्याचे जाणकार सांगत आहेत.