

संगमनेर: कृषी क्षेत्रात येणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना मिळावी, याकरता शिवछत्रपती प्रतिष्ठान व अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या कृषी व डेअरी प्रदर्शनाला तीन दिवसांमध्ये 3 लाख 9 हजार 472 नागरिकांनी भेट दिली असून कृषी प्रदर्शनामुळे कृषी महाविद्यालयाच्या परिसर नागरिकांनी गजबजून गेल्याचे दिसले.
अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयात शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कळस कृषी व डेअरी प्रदर्शनाला डॉ.सुधीर तांबे, माजी मंत्री दिनेश ठाकूर, केंद्रीय पशुसंवर्धन आयुक्त प्रवीण मलिक, दुर्गाताई तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात, डॉ.मैथिलीताई तांबे, दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉ.सुजित खिलारी यांच्यासह अमृत उद्योग समूहातील विविध पदाधिकारी व जिल्हा सह राज्यभरातून अनेक नागरिकांनी भेटी दिल्या.
माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये 40 एकरात हे भव्य कृषी प्रदर्शन होत आहे. अत्यंत आत्याधुनिक सुविधा, पाच एकर परिसरामध्ये प्रशस्त पीक प्रात्यक्षिक प्लॉट, 69 पिकांच्या 350 जाती, कृषी मार्गदर्शन, शैक्षणिक एक्स्पो, मशिनरी एक्सपो, खाद्य स्टॉल, महिला बचत गटांचे विविध वस्तू विक्रीचे स्टॉल, डेरी प्रदर्शनामध्ये राज्यभरातून दाखल झालेल्या 250 विविध गायी याचबरोबर दीड टन वजनाचा वळू हे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.
याप्रसंगी केंद्रीय पशु आयुक्त प्रवीण मलिक म्हणाले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे अनेक वर्ष कृषी मंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रामध्ये कृषी क्रांती झाली असून या प्रदर्शनामुळे या भागातील शेतकऱ्यांना पशुसंवर्धन व कृषी क्षेत्रातील नवीन संशोधनाविषयी माहिती मिळणार आहे. एका जागेवर होत असलेल्या सर्व सुविधांच्या माहितीमुळे हे प्रदर्शन नक्कीच देश पातळीवरील असे ते म्हणाले. नगराध्यक्षा डॉ.मैथिलीताई तांबे म्हणाल्या की, ग्रामीण भागामध्ये होत असलेले हे मोठे प्रदर्शन असून विद्यार्थी व महिलांची संख्या मोठी लक्षणीय आहे. शेती हा व्यवसाय म्हणून जर केला तर नक्कीच फायदेशीर असून नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे. प्रास्ताविक डॉ.जयश्रीताई थोरात, सूत्रसंचालन नामदेव कहांडळ व बाचकर जी.बी यांनी केले. सागर वाकचौरे यांनी आभार मानले.
ट्यूलिप गार्डनचे ठरतयं आकर्षण
बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेले टुलिप गार्डन हे काश्मीर नंतर महाराष्ट्रातील पहिले गार्डन ठरले आहे या ट्युलिप गार्डनला आत्तापर्यंत 1 लाख 80 हजार नागरिकांनी भेट दिली असून सेल्फी पॉईंट व आलेले फुले पाहण्यासाठी तरुणाईची झुंबड उडाली आहे.