

शशिकांत पवार
नगर तालुका: नगर तालुक्यात जून महिना सुरू झाला असला, तरी पावसाच्या प्रतीक्षेत असलेला ग्रामीण भाग आजही पाण्याच्या टंचाईने होरपळत आहे. एका बाजूला खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण करून पेरणीची तयारी केली आहे, तर दुसऱ्या बाजूला पिण्याच्या पाण्यासाठी अनेक गावांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. तालुक्यातील १५ गावांमध्ये तहान भागविण्यासाठी टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जेऊर व बाबुर्डी गावचे टँकरसाठी प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल झाले आहेत.
पावसाळ्याच्या उंबरठ्यावर तब्बल १५ गावांमध्ये सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, जेऊर आणि बाबुर्डी या गावांकडूनही टँकर सुरू करण्यासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आले असल्याने तालुक्यात विदारक परिस्थितीचे चित्र दिसून येत आहे. वाढते तापमान, घटलेली भूजल पातळी आणि रिकामे पडलेले विहिरी-बोअरवेल यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची चिंता वाढली आहे. पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असले, तरी अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने पाण्याचा प्रश्न कायम आहे.
शेतकरी वर्गाने खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेत शिवार तयार करून ठेवले आहेत. नांगरणी, कुळवणी, वखरणी यांसह मशागतीची बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. बियाणे, खते आणि इतर साहित्याची जमवाजमवही करण्यात आली आहे. मात्र, पेरणीसाठी आवश्यक असलेल्या दमदार पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम असल्याने बळिराजाच्या नजरा आकाशाकडे खिळून आहेत. काळे ढग दिसले की आशा पल्लवीत होते. मात्र, काही वेळातच ढग विरून जात असल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरत आहे. खरीप हंगामातील पेरणीवर चिंतेचे ढग दिसून येत आहेत.
मागील वर्षी याच काळात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावून पूर परिस्थितीने धुमाकूळ घातला होता. शिवार हिरवेगार होण्यास सुरुवात झाली होती. यंदा मात्र परिस्थिती उलट आहे. गावोगावी पाण्याची चिंता वाढत असताना शेतकरी पावसाच्या आगमनाची वाट पाहत आहे. ग्रामीण भागात पाणी आणि पाऊस हेच सध्या चर्चेचे प्रमुख विषय बनले आहेत.
जेऊर गावातील वाड्या-वस्त्यांवर पाणीटंचाई जाणवत आहे. टॅंकरने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आलेला आहे. पाऊस लांबल्यास पाणीटंचाईच्या झळा तीव्र होणार आहेत.
ज्योती तोडमल, सरपंच, जेऊर
बहिरवाडी गावामध्ये एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. परिसरातील बहुतांशी जलस्रोत कोरडे पडले असल्याने तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे.
अंजना येवले, सरपंच, बहिरवाडी