

नगर: महिला अत्याचाराचे गुन्ह्यातील आरोपी माजी महापौर अभिषेक कळमकर याला न्यायालयाने स्टँडिंग वारंट काढले. मात्र, तरीही आरोपींचा शोध लागत नसल्याने आरोपी अभिषेक कळमकर यास हजर थेट न्यायालयात हजर होण्याचे आदेश काढले आहेत. न्यायालयात हजर न झाल्यास फरार घोषित करण्यात येणार असून, मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, 18 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी व त्यापूर्वी विळद घाट अहिल्यानगर येथे आरोपी कळमकर याने फिर्यादीस नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार केला आणि त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करून त्याचे सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
तसेच, फिर्यादी व फिर्यादीच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, कळमकर सापडत नसल्याने त्याच्याविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 75 प्रमाणे स्टँडिंग वॉरंट काढण्यात आले होते. स्टँडिंग वॉरंट संपूर्ण महाराष्ट्रात पाठवून आरोपीचा शोध घेण्यात आला.
मात्र, तो सापडला नाही. त्यानंतर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 84 प्रमाणे कार्यवाही होण्याबाबत न्यायालयास पत्रव्यवहार करण्यात आला असून न्यायालयाने आरोपीस हजर होण्याबाबत जाहीरनामा काढून तो सार्वजनिक ठिकाणी दर्शनीय भागामध्ये प्रसिद्ध करण्याबाबत आदेशित केले आहेत.
न्यायालयाने दिलेल्या जाहिरनाम्यामध्ये आरोपी अभिषेक कळमकर यास तत्काळ प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर समक्ष हजर होण्याबाबत आदेश दिले आहेत. आरोपी कळमकर न्यायालयासमोर हजर न राहिल्यास त्यास फरार घोषित करण्यात येणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. कळमकर न्यायालयासमोर हजर न राहिल्यास त्याची संपत्ती जप्तीची कार्यवाही करण्यात येणार आहे.