

सोनगाव: उन्हाचा तडाखा वाढल्याने दुपारच्या सुमारास रस्ते निर्मनुष्य दिसत आहे.सोनगाव-राहुरी व राहाता तालुक्यात एप्रिल महिन्यातच उष्णतेने तब्बल 41 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दुपारच्या सुमारास बाजारपेठा व मुख्य रस्ते निर्मनुष्य दिसत असून, उन्हाच्या झळांपासून बचावासाठी नागरिकांनी घरातच थांबणे पसंत केले आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 5 या कालावधीत उन्हाचा कडाका असह्य होत असून, अंगाची लाहीलाही वाढली आहे. उष्माघाताचा धोका तीव्र झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
उष्णतेचा परिणाम शेतीवर होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी सकाळी लवकर किंवा सायंकाळी शेतीकामे करावीत, जनावरांना सावलीत ठेवून पुरेसे पाणी द्यावे तसेच ठिबक सिंचनाचा वापर करावा, असे आवाहन केले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असून उष्णतेची लाट कायम राहणार असल्याने नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
शितपेयांना वाढली मागणी
उष्णतेपासून दिलासा मिळण्यासाठी ताक, दही, लिंबूपाणी यांसारख्या पारंपरिक शितपेयांना मागणी वाढली आहे. शरीराला थंडावा देणाऱ्या शितपेयांबरोबरच पाण्याचे अधिक सेवन करण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्कतेचा इशारा देत दुपारच्या वेळेत घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. डोक्यावर संरक्षण ठेवणे, सैल व हलके कपडे परिधान करणे तसेच पुरेसे पाणी पिणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.