नगर: महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या प्रक्रियेसाठी सुमारे 1800 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना टपाली मतदानासाठी 13 जानेवारी रोजी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांचे नाव ज्या प्रभागामध्ये असेल, त्या प्रभागाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात सकाळी 10 ते सायंकाळी 5 वेळेत संबंधिताला मतदानाचा हक्क बजावता येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.
शहरातील 345 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी 1800 कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून 29 डिसेंबर रोजी झालेल्या पहिल्या प्रशिक्षणादरम्यान संबंधितांना टपाली मतदानासाठी अर्ज देण्यात आले होते. 6 जानेवारी रोजी झालेल्या दुसऱ्या प्रशिक्षणावेळी सुमारे साडेसातशे कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानासाठी नोंदणी केलेली आहे.
मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी दिवसभर निवडणुकीचे कामकाज असणार आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी 13 जानेवारी रोजी टपाली मतदानाची प्रक्रिया राबवली जाणार आहे.
महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय 6 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडे प्रभागांचे विभाजन करून देण्यात आलेले आहे. संबंधित कर्मचारी मतदाराचे ज्या प्रभागाच्या मतदार यादीत नाव असेल, त्या प्रभागाच्या निवडणूक कार्यालयात उभारलेल्या मतदान केंद्रात कर्मचाऱ्याला टपाली मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
केडगाव प्रभाग क्र. 15, 16 आणि 17 साठी भाग्योदय मंगल कार्यालयातील ऑफिसमध्ये टपाली मतदान सुविधा देण्यात आली आहे, असे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.