

राहुरी: सह्याद्रीच्या कुशीतून कोसळणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबाने यंदा मुळा धरणाच्या जलाशयात नवजीवनाची चाहूल निर्माण केली आहे. काही महिन्यांपूर्वी तळ गाठण्याची भीती निर्माण करणारे हेच धरण आता भरभरून उसळत असून जलसाठ्याची घोडदौड थेट 20 हजार दलघफूच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. पावसाच्या अखंड कृपावर्षावामुळे जलाशय दिवसागणिक फुलत आहे आणि त्याचबरोबर हजारो शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील आशेचे दिवेही अधिक तेजाने प्रज्वलित होत आहेत.
मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, उपअभियंता विलास पाटील व शाखाभियंता राजेंद्र पारखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (2 ऑगस्ट) सायंकाळी सहा वाजेपर्यंत धरणाची पाणीपातळी 1800.20 फूट इतकी झाली असून एकूण जलसाठा 19 हजार 720 दलघफू इतका नोंदविण्यात आला.
अकोले तालुक्यातील कोतुळ हद्दीतील लहित खुर्द परिसरातून मुळा नदी 11 हजार 587 क्युसेक वेगाने धरणाकडे झेपावत आहे. धरणाच्या सांडव्यातून तसेच उजव्या आणि डाव्या कालव्यातून अद्याप एक थेंबही पाणी सोडले जात नसल्याने संपूर्ण आवक जलाशयात साठविली जात आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील अंबित, शिसवद, खडकी, कोतुळ, घारगाव तसेच लाभक्षेत्रातील सावरचोळ, चास आणि डोळासणे परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सातत्याने सुरू आहे.
त्यामुळे धरणाचा जलाशय दिवसेंदिवस अधिक समृद्ध होत आहे. सोमवारी (3 ऑगस्ट) धरण 20 हजार दलघफूचा टप्पा पार करेल, असा विश्वास पाटबंधारे विभागाला आहे. पावसाची ही लय अशीच कायम राहिली, तर 15 ऑगस्टपूर्वीच धरण पूर्ण क्षमतेच्या उंबरठ्यावर पोहोचण्याची आशा बळावली आहे. मुळा धरण पूर्ण भरल्यावर खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होते.
अतिरिक्त आवर्तने मिळाल्यामुळे शेतीला नवसंजीवनी मिळते. कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलते, तर ऊस, भाजीपाला, फळबागा आणि विविध नगदी पिकांसाठी पाण्याची मोठी हमी निर्माण होते.
१५ ऑगस्टपूर्वीच उघडू शकतात दरवाजे
मुळा धरणासाठी निश्चित करण्यात आलेल्या नियमानुसार 15 ऑगस्टपूर्वी धरणातील जलसाठा 22 हजार 820 दलघफू पातळीवर पोहोचल्यानंतरही आवक कायम राहिल्यास धरणाचे सर्व 11 दरवाजे उघडून सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे.