Ahilyanagar Teachers Bank AGM: शिक्षक बँकेच्या सभेत घोषणांचा पाऊस; निवडणुकीपूर्वी व्याजदर कपात, कर्जवाढ अन् शेड्यूल्ड बँकेचा मुद्दा स्थगित

वार्षिक सभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; महिलांच्या वादामुळे गोंधळ, पुढील निवडणुकीचे रणशिंग वर्षभर आधीच फुंकले
Ahilyanagar Teachers Bank AGM
Ahilyanagar Teachers Bank AGMPudhari
Published on
Updated on

नगर: अकरा हजार सभासदांच्या शिक्षक बँकेची पुढच्या वर्षी निवडणूक आहे. या पार्श्वभूमीवर काल झालेल्या शेवटच्या वार्षिक सभेत अनेक महत्वपूर्ण निर्णयांचा अक्षरशः पाऊस पडला. डीसीपीएस बांधवांसाठी कुटूंब आधार निधी 21 लाख, शैक्षणिक, वाहन, गृह कर्ज आता सात टक्के दराने, जामीन कर्जाची 0.15 टक्के व्याज कपात, कर्ज मर्यादेत पाच लाखांची वाढ, आचार्य दोंदे पुरस्कारात दुप्पट वाढ, 1500 रुपयांची ना परतावा कपात रद्द आणि सर्वात चर्चेत असलेला शेड्यूल्ड बँकेचा मुद्दा तूर्त स्थगित, अशा अनेक मोठ्या ठरावातून आगामी निवडणुकीचा जणू वर्षभर अगोदरच प्रचार नारळ फुटल्याचे दिसले.

Ahilyanagar Teachers Bank AGM
Shrigonda Soil Mafia: श्रीगोंद्यात माती माफियांचा वाढता संघर्ष; गोळीबार प्रकरणानंतर पोलिसांची मोठी कारवाई सुरू

शिक्षक बँकेच्या अध्यक्षा सरस्वती घुले यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. यावेळी उपाध्यक्ष शिवाजी कराड, संदीप मोटे, कल्याणराव लवांडे, बाळू सरोदे, गोरक्ष विटनोर, बाळासाहेब ताकपीर आदी संचालक मंडळासह एमडी सूर्यकांत जगताप उपस्थित होते. सभेसाठी ज्येष्ठ शिक्षक नेते आबासाहेब जगताप, राजेंद्र शिंदे, बबनराव गाडेकर, अर्जून शिरसाठ, दादासाहेब कुलट, ऐक्य मंडळाचे शरद वांढेकर, शिक्षक भारतीचे दिनेश खोसे, इब्टाचे गौतम मिसाळ, जयश्री इंगळे आदींनीही उपस्थिती दर्शवली.

सभेत सुरुवातीपासूनच समिती, इब्टा, शिक्षक भारती, प्रहार व अन्य संघटनांच्या विरोधी सभासदांनी कर्जव्याजदर सात टक्के करावा, कंत्राटी कर्मचारी भरती रद्द करावी, शेड्यूल्ड बँक आणि बाहेरचे सभासद नको, अशा आशयाचे फलक दर्शवत सभेचे लक्ष वेधले. तत्पूर्वी, सभागृहाबाहेर प्रतिकात्मक सभा घेत सभेतील व्यूहरचनाही ठरवली. त्यानुसार, सभा सुरू झाल्यापासून विरोधक आक्रमक दिसले. तर सत्ताधाऱ्यांनी हा विरोध मोडून काढला.

Ahilyanagar Teachers Bank AGM
Nashik Pune Railway: नाशिक–पुणे सरळ रेल्वेसाठी निर्णायक लढा; ९ ऑगस्टला महामार्गावर एकाचवेळी चक्काजामची घोषणा

सभेत जुनी पेन्शनचे राजेंद्र ठोकळ, मनीषा चाबकूस्वार, जयश्री इंगळे, मनीषा वाकचौरे आदींनी भाषणे केली. शेड्यूल्ड बँकेचा प्रस्ताव रद्द करावा, असा प्रस्ताव गुरुमाऊली सदिच्छा मंडळाचे अध्यक्ष संतोष दुसुंगे यांनी प्रस्ताव मांडला, विरोधी मंडळाचे अध्यक्ष सुरेश निवडुंगे यांनी अनुमोदन दिले. त्यावर सभागृहात टाळ्या कडाडल्या. यावेळी कंत्राटी कर्मचारी भरती, व्यवस्थापन खर्च, कर्जाचे व्याज यावरून सभा शेवटपर्यंत तापलेलीच होती. सभेत महिलांची संख्या लक्षणीय होती. दुपारनंतर विकास मंडळाची वार्षिक सभा पार पडली.

गोंधळ घालून बँक चालत नसते : तांबे

पुढच्या वर्षी निवडणुका आहेत, त्यामुळे तुम्हाला सभासदांसमोर गोंधळ घालून विरोध दाखवावा लागेल, हे मलाही मान्य आहे. पण भाषणे करून, गोंधळ घालून, खोटी आश्वासने देऊन बँक चालत नसती. त्यासाठी जे शब्द दिले, ते पूर्ण करावे लागतात. मीही जे बोलतो, ते करतोच, अशा शब्दात बापूसाहेब तांबे यांनी विरोधकांचा समाचार घेताना सभासदांच्या मागण्यांनाही हात घातला. कर्जाचा व्याजदर कमीत कमी, ठेवीवर व्याजदर जास्तीत जास्त, तर लाभांशही जास्त, या तीनही जनभावना लक्षात घेत तांबेंनी मोठे निर्णय घेऊन सभासदांना खूश केले. डीपीएसधारकांची संख्याही निर्णायक आहे, त्यांनाही वाढीव तरतूद दिली, पारितोषिक कार्यक्रमालाही दुप्पट निधी दिला. तसेच शेड्यूल्ड बँक आणि बाहेरच्या सभासदांना विरोध करण्यासाठी विरोधी प्रवीण ठुबे यांनी दोन दिवस उपोषण केले, मात्र आपल्याच मंडळाचे अध्यक्ष संतोष दुसुंगे यांच्याकडूनच हा प्रस्ताव सभेसमोर रद्द करण्याचा ठराव मांडण्याची खेळीही तांबेंनी केली. सभासदांच्या सर्व मागण्या आम्ही मंजूर केल्या आहेत. त्यामुळे आता त्यांनाही आपला फायदा कुठे आहे, हे समजले आहे, असे सांगताच, विरोधी सभासदांनीही टाळ्या दिल्या. दरम्यान, विरोधक प्रवीण ठुबे हे बोलण्यासाठी मंचावर गेले, मात्र त्याचवेळी ‘जेवनाची सुट्टी’ जाहीर झाली, हा योगायोग की विरोधकांची हवा काढून घेणारा हा डाव देखील बापूंच्याच खेळीचा एक भाग,याविषयीही जोरदार चर्चा झाली.

Ahilyanagar Teachers Bank AGM
Ashok Kharat: भोंदू अशोक खरात सात दिवस पोलिस कोठडीत; कोटींच्या व्यवहारांचे गूढ उलगडणार

यंदा तुमचा टांगा पलटीच : ठुबे

हजारो शिक्षक सभासदांच्या कष्ट, विश्वास आणि त्यागातून उभी राहिलेल्या बँकेचे संचालक हे मालक नसून केवळ विश्वस्त आहेत. पदे कायमची नसतात, खुर्च्या कायमच्या नसतात. पण सभासदांचा न्यायाचा लढा कायम असतो. आज आवाज दाबला असेल, पण उद्या हाच आवाज परिवर्तनाचे वादळ निर्माण करेल. सत्तेच्या अहंकाराने इतिहास लिहिला जात नाही; इतिहास लिहिला जातो तो सभासदांच्या विश्वासाने. त्यामुळे काहीही करा, आगामी निवडणुकीत तुमचा टांगा पलटी ठरलेला आहे, अशा शब्दात विरोधी मंडळाने नेते प्रवीण ठुबे यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले. ही बँक सभासदांची आहे, कोणाची खासगी प्रॉपर्टी नाही, अशा शब्दात ठुबेंनी टीका केली. इब्टाचे एकनाथ व्यवहारे यांनीही सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत सत्ताधारी नेतृत्वाच्या हुकूमशाही प्रवृत्तीचा तीव्र निषेध करण्यात आला. बँकेतील हुकूमशाही, लोकशाही मूल्यांचा होत असलेला अवमान आणि सभासदांच्या मतांना दिली जाणारी दुय्यम वागणूक याविरोधात भविष्यात जिल्हाभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल. याबाबतची घोषणा संघ प्रणित मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुरेश निवडुंगे, इबटाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ व्यवहारे, शिक्षक भारतीचे दिनेश खोसे, प्रहार शिक्षक संघटनेचे विजय देठे, शिक्षक परिषद जिल्हाध्यक्ष अमित पन्हाळे तसेच डीसीपीएस संघटनेचे कार्याध्यक्ष राज कदम यांनी संयुक्तपणे केली.

यंदा शिक्षिकांनी माईक तोडला

दरवर्षी गुरुजींमध्ये माईक खेचाखेची, तोडाफोडी, धराधरी झाल्याचे पहायला मिळाले. यंदा मात्र महिला शिक्षिका आक्रमक दिसल्या. सत्ताधारी गटाच्या एका महिला सभासदाने विरोधी गटाच्या ‘चिमूटभर’ महिला अशा शब्द प्रयोग करताच वातावरण तापले. विरोधी महिलांनी भेट मंचावर जाऊन जाब विचारला, माफी मागा, असा आरडाओरडा झाला. त्यानंतर विद्यूलता आढाव ह्या मदतीला धावल्या. मात्र विरोधी महिला कमालीच्या आक्रमक होत्या. माईकची खेचाखेची झाली, यात माईकची वायर तुटली. महिला पोलिस मंचावर पोहचल्या, संचालक मंडळाने माफी मागितल्यानंतर वातावरण निवळले. मात्र हा प्रकार पूर्वनियोजित होता, असे आरोपही कानावर आले.

हजरजबाबी महिला चेअरमन!

श्रीगोंद्यांचे संचालक संदीप मोटे हेच सभेला उत्तरे देत असताना अविनाश निंभोरे यांनी आक्षेप घेत महिला चेअरमन आहेत, त्यांना संधी दिली पाहिजे, असे मत मांडले. त्यावर चेअरमन सरस्वती घुले यांनी ‘आमच्यात भांडणे लावू नका, आम्ही एकविचारानेच निर्णय घेतो’ अशा शब्दात विरोधकांचीच फिरकी घेतली.

Ahilyanagar Teachers Bank AGM
Kopargaon Truck Accident: ओव्हरटेकचा जीवघेणा प्रयत्न! शिर्डी संस्थानच्या महिला कर्मचाऱ्याचा मालमोटारीखाली चिरडून मृत्यू

‘शेड्यूल्ड बँकेंसंदर्भात विशेष सभा’

आम्ही ठरवलं असतं तर विषय मंजूर केले असते, पण ती आमची नियत नाही. शेवटच्या सभासदाचा विचार ऐकणारे आम्ही आहोत. त्यामुळेच शेड्यूल्ड बँकेचा विषय स्थगित ठेवत आहोत. पुढील तीन ते चार महिन्यांनी दिवाळीनंतर विशेष सभा घेऊन त्यात हा विषय पुन्हा ठेवला जाईल. तोपर्यंत आम्ही वाडीवस्तीवरच्या शिक्षकापर्यंत पोहचू, त्यांना शेड्यूल्ड बँकेचे फायदा काय आहेत ते समजावून सांगू आणि त्यानंतरच हा विषय पुढे मांडू, अशा शब्दात बापू तांबेंनी सभासदांची मने जिंकली.

अन् सौ. तांबे मदतीला धावल्या

सभेत बसलेल्या एका महिला शिक्षकेला चक्कर आल्याचे समजताच साहेबराव अनाप यांनी पाणी आणण्याच्या सूचना केल्या. नारायण पिसे हे तत्काळ पाणी घेऊन गेले, तर अर्चना तांबे यांनी संबंधित महिलेच्या तोंडावर पाणी शिंपडून शुद्धीवर आणले. त्यांना सभेतून बाहेर हवेला नेले; बापू तांबे यांनीही तिकडे धाव घेतल्याचे दिसले. अर्चना तांबे यांनी दाखवलेली ही तत्परता व आपुलकी सभागृहातील महिलांमधूनही कौतुकाचा विषय ठरला होता.

उद्याची निवडणूक चुरशीची

सत्ताधारी गटात गुरूमाऊली सदिच्छासह ऐक्य व अन्य संघटनांची मोठी ताकद आहे. तर दुसरीकडे विरोधी गटातील शिक्षक समिती, इब्टा, शिक्षक भारती, प्रहार यासह अन्य संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. सत्ताधाऱ्यांनी घेतलेले सर्वच निर्णय हे आमचे उपोषणे, आंदोलने आणि मागण्यांचा रेटा, यामुळेच झाल्याचे ते पटवून देत होते. विरोधी संघटनांची ही वज्रमूठ आगामी निवडणूक चुरशीची होणार, हे दाखवत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news