

गणेश जेवरे
कर्जत: तालुक्यातील मिरजगाव येथील एका असहाय एकल महिलेचे घर बेकायदेशीरपणे पाडून तिला आणि तिच्या दोन लहान मुलांना घरातून हाकलून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. न्याय न मिळाल्याने पीडित महिलेवर आपल्या दोन मुलांसह अक्षरशः रस्त्यावरच संसार मांडण्याची वेळ आली. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
याबाबत पीडित महिला अनिता प्रमोद कोरडे यांनी उपविभागीय पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल करून कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. तक्रारदार अनिता कोरडे यांचे पती प्रमोद कोरडे यांचे २ मार्च २०२० रोजी अपघाती निधन झाले. त्यानंतर त्यांच्या हक्काच्या जमिनीवर (गट नं. ९७२/१ व मिरजगाव ग्रा.पं. मिळकत ४२३८) अनिता कोरडे आणि त्यांच्या दोन मुलांची वारस म्हणून कायदेशीर नोंदही झाली.
मात्र, नंतर गावातील तिघा बापलेकांनी या जागेवर बेकायदेशीरपणे ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. अनिता यांनी तक्रारीत म्हटले आहे, की या आरोपींनी संगनमत करून गेल्या १ ऑक्टोबर रोजी त्यांच्या जागेवर बेकायदेशीररित्या ताबा घेतला. जेव्हा त्या मिरजगाव व कर्जत पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेल्या, तेव्हा त्यांची तक्रार घेतली गेली नाही. उलट आरोपींनी त्यांना घरात घुसल्यास ‘तुला जेलमध्ये टाकू’ अशी धमकी दिली.
त्यानंतर आरोपींनी घाईघाईने अनिता यांचे घर पाडण्याचे काम सुरू केले. या अन्यायाला विरोध केला असता, आरोपींनी त्यांना शिवीगाळ करीत आडवी आली, तर जिवे मारू अशी धमकी दिली. अनिता कोरडे आणि त्यांची दोन लहान मुले पूर्णपणे उघड्यावर आली आहेत. राहते घर पाडल्यामुळे आणि राहण्यासाठी दुसरी कोणतीही जागा नसल्याने, या महिलेवर आपल्या मुलांसह भररस्त्यात शेगडी आणि भांडी मांडून संसार मांडण्याची केविलवाणी वेळ आली आहे.
‘माझ्यासह मुलांच्या जिवाला धोका आहे,’ असेही अनिता कोरडे यांनी तक्रारीत म्हटले आहे. मोलमजुरी करून मुलांचा सांभाळ करणाऱ्या या महिलेचा आधार हिरावून घेतला गेला आहे. विशेष म्हणजे प्रस्तुत प्रतिनिधीने या महिलेची भेट घेतली, तेव्हा त्यांची मुलगी तेथेच अभ्यास करत असल्याचेही दिसून आले. पोलिस यंत्रणा आणि समाजही या एकल महिलेच्या तक्रारीची दखल घेईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.