

दीपक रोकडे
नगर: महात्मा जोतिबा फुले यांना मुलींसाठी शाळा सुरू करण्याची प्रेरणा देणाऱ्या आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अध्यापनाचे प्रशिक्षण देणाऱ्या अहमदनगरच्या (आता अहिल्यानगर) सिंथिया फरार यांची दीडशे वर्षांहून अधिक काळ अज्ञातात असलेली समाधी नगरच्या संशोधकांनी शोधून काढली आहे. महात्मा फुले यांना मुलींची शाळा काढण्यास प्रेरणा देणाऱ्या फरारबाईंची समाधी जोतिबांच्या द्विशताब्दी जयंती वर्षांत शोधता आली, याचा आनंद शब्दातीत असल्याची भावना या संशोधकांनी व्यक्त केली आहे.
प्रत्यक्ष तळागाळात जाऊन संशोधन करणारे इंजिनियर अभिजीत एकनाथ वाघ, माध्यमक्षेत्रात कार्यरत असलेले इतिहासाचे अभ्यासक भैरवनाथ वाकळे आणि व्यवसायाने टेलर असलेले आसिफ शेख दुलेखान यांच्यासह मूळचे श्रीरामपूर येथील ज्येष्ठ कामिल पारखे यांनी हे संशोधन केले. मिस सिंथिया फरार या अमेरिकन मराठी मिशनच्या पहिल्या अविवाहित महिला मिशनरी होत्या. त्या पहिल्यांदा २९ डिसेंबर १८२७ रोजी अमेरिकेतून मुंबईला आल्या. अमेरिकन मिशनने १८३८ मध्ये नगर येथे सुरू केलेल्या क्लेरा ब्रूस गर्ल्स स्कूलमध्ये त्यांनी काम सुरू केले. ही शाळा आजही सुरू आहे. २५ जानेवारी १८६२ रोजी फरारबाईंचे निधन झाले, तेव्हापर्यंत त्या या शाळेत कार्यरत होत्या.
अमेरिकन मराठी मिशनच्या १८६२च्या वार्षिक अहवालात सिंथिया फरार यांच्यावरील मृत्युलेखात महात्मा जोतिबा फुले यांचे प्रत्यक्ष नाव न घेता त्यांचा संदर्भ दिलेला आहे. ‘मुलींना शिक्षण देण्याची खूप इच्छा असलेल्या पुणे शहरातील एका तरुण सद्गृहस्थाला मिस फरार यांनी आनंदाने सल्ला आणि मार्गदर्शन पुरवले. मुलींच्या शाळा सुरू करण्याबाबत आणि या शाळांचे व्यवस्थापन करण्याबाबत फरार यांनी या तरुणाला मार्गदर्शन केले. अहमदनगरहून पुण्याला परतल्यावर या तरुणाने हिंदू मुलींना शिक्षण देण्यासाठी तेथे शाळा सुरू केल्या’ असे त्यात स्पष्ट केल्याचे पारखे यांनी सांगितले.
दरम्यान, महात्मा फुले यांनीही सिंथिया फरार यांचे ऋण व्यक्त केल्याचे दाखले उपलब्ध आहेत. जोतिबांनी आपले मित्र सदाशिवराव गोवंडे यांच्याबरोबर नगरला सिंथिया फरार यांच्या मुलींच्या शाळेला भेट दिल्यानंतर, फरारबाईंशी बोलणे झाल्यानंतर जोतिबा खूप प्रभावित झाले आणि नगरहून पुण्याला आल्यानंतर आपण लगेचच मुलींची शाळा सुरू केली, असे जोतिबांनी लिहून ठेवल्याचा उल्लेख धनंजय कीर यांनी लिहिलेल्या ‘महात्मा जोतिबा फुले’ या चरित्रग्रंथात आहे. ज्येष्ठ संशोधक दिवंगत हरी नरके यांनीही याबाबत महात्मा फुले समग्र वाङ्मय आणि इतर अनेक ठिकाणी उल्लेख केला आहे.
पारखे यांनी दोन वर्षांपूर्वीच सिंथिया फरार यांचे चरित्र लिहिले. मात्र फरार यांचे छायाचित्र शोधूनही मिळाले नाही. आता समाधी सापडल्याने छायाचित्रही सापडेलच, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या चरित्रात महत्त्वाची भूमिका असणाऱ्या व्यक्ती, स्थळे आणि वास्तू यांना उजेडात आणायला हवे, अशी गरजही हे संशोधक व्यक्त करतात.
..असा लागला समाधीचा शोध
महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांना मुलींच्या शाळेची प्रेरणा देणाऱ्या सिंथिया फरार यांची समाधी शोधण्याचा निर्धार नगरचे अभिजीत वाघ, भैरवनाथ वाकळे आणि आसिफ शेख दुले खान यांनी केला. गेल्या अनेक महिन्यांपासून ते ठिकठिकाणच्या कब्रस्तानांमध्ये शोध घेत होते. सिद्धार्थनगरसह विविध कब्रस्ताने आणि त्यातील प्रत्येक कबर त्यांनी तपासली. अखेर बुऱ्हाणनगर रस्त्याच्या बाजूला असलेल्या जुन्या कब्रस्तानात गवत आणि झुडपांमध्ये फरार यांची कबर शुक्रवारी (दि. १६ ऑक्टोबर) सापडली. यात बरोबरीने काम करणाऱ्या कामिल पारखे यांना त्यांनी तातडीने बोलावून घेतले. साफसफाई करून सर्वांनी कबरीवर फुले वाहिली. गेल्या दीडशे वर्षांत कदाचित प्रथमच या कबरीवर कुणी फुले वाहिली असावीत.