

पुणेः राज्यात कडाक्याची थंडी सुरू झाली असून गत पाच वर्षात 2019 नंतर सर्वात नीच्चांकी तापमानाची नोंद झाली. अहिल्यानगरचे किमान तापमान सर्वात कमी 6.6 अंशावर खाली आले होते. उत्तर भारतातून झोतवारा राज्यात येत असल्याने थंडीत वाढ झाली आहे.
उत्तर भारतातून झोतवारा (हवेच्या वरच्या थरातील) थंड वारे वेगाने महाराष्ट्रात येण्यास सुरुवात झाल्याने राज्यातील किमान तापमानात 5 ते 7 अंशांनी घट झाली आहे. गुरुवारी राज्यातील बहुतांश शहरांचे किमान तापमान 10 अंशाखाली गेल्याने राज्याला हुडहुडी भरली.
समुद्रासपाटीपासून दहा ते पंधरा हजार फुट उंचीवर वाऱ्याच्या वरच्या थरात गारवारे वेगाने वाहण्यास सुरुवात झाली आहे. ते वारे उत्तर भारतातून महाराष्ट्रात येण्यास सुरुवात झाली आहे. हे वारे खालच्या थरांत आले आहे. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी 5 पासूनच राज्य गारठून पारा 6.6 ते 8 अंश इतका खाली आला. त्यामुळे 2019 नंतर सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली.