

संगमनेर: सध्या ग्रामीण भागात बिबट्यांचे हल्ल्याचे प्रमाण वाढले असून शालेय मुलांसह नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. अंधार लवकर पडत असल्याने मुलं एकटी घरी जातात. हल्ल्याचे गांर्भीय पाहून शाळेच्या वेळेत बदल करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
शाळा व्यवस्थाप समिती व शिक्षकांवर विद्यार्थ्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी असून शाळेची वेळ बदलून विद्यार्थ्यांचा धोका दूर करण्याचा प्रयत्न असल्याचे विखे पाटील म्हणाले. जिल्हा परिषदेसोबतच ग्रामीण भागातील शाळेच्या वेळेत बदल केला जाणार आहे. वाडी वस्तीवरील विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर एकटेच घरी जातात.
अंधार लवकर पडत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्थानिक पातळीवर काही दिवसांकरीता वाहनांची व्यवस्था करावी तसेच ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्याबाबत पुढाकार घेण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले. शाळेच्या इमारतीचे काम चांगले झाल्याचे कौतूक करतानाच विखे पाटील यांनी एखादे विकास काम कमी करा, पण विद्यार्थ्यांच्या स्वच्छतागृह बांधकमासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा विखे पाटील यांनी व्यक्त केली.
डिग्रस येथील जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्याचे उद्घाटन विखे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी आ. खताळ, सरपंच अशोक खेमनर उपस्थित होते. संगमनेरातील परिवर्तन जनतेने विकासासाठी केल्याचे सांगत आ. खताळ यांच्या माध्यमातून विकास कामांची प्रक्रिया चांगली सुरू असल्याचे विखे पाटील म्हणाले. निळवंडेचे पाणी आल्याने जिरायत भागाला दिलासा मिळाला असून पाणी टंचाईची समस्याही दूर झाली आहे. निळवंडेच्या पाण्याचा लाभ डिग्रसला देण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सुचना केल्या आहेत. अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांसाठी संगमनेर तालुक्यात 23 कोटी रुपये मंजूर झाल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
साकूर पठार भागाचा पाणी प्रश्न सुटेल!
मागील 40 वर्षात जे प्रश्न सुटले नाहीत ते प्राधान्याने सोडविण्याचे काम सुरू केले आहे. साकूर पठार भागाचा पाणी प्रश्न भोजापूर प्रमाणेच मार्गी लागेल. विकास कामांना निधी मंजूर करून आणण्याचे काम आपण करीत आहोत. चाळीस वर्षात निधी आणता आला नाही, ते मात्र आता खोटे श्रेय घेत असल्याची टिका आ. अमोल खताळ यांनी केली.