

बोधेगाव: शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथे प्रगतशील शेतकरी मुकुंद लक्ष्मण टाक यांच्या शेतात श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था, कृषी विज्ञान केंद्र केव्हीके दहिगाव-ने यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॅक्टरचलित एक ओळ ऊस बेणे लागवड यंत्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
ऊस शेतीतील वाढत्या खर्चाचे प्रमुख कारण म्हणजे मजुरांची कमतरता. ऊस बेणे तोडणे, दोन डोळ्यांचे बेणे तयार करणे, सरी पाडणे व मजुरांच्या मदतीने लागवड करण्यासाठी पाणी आणि वीज उपलब्ध असणे आवश्यक असते. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी हे यंत्र फारच उपयुक्त ठरणार असल्याचे कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ज्ञ राहुल पाटील यांनी सांगितले.
पाच कामे एकाच वेळी या आधुनिक यंत्राद्वारे पाच कामे एकाच वेळी पार पडतात. त्यामध्ये ऊस बेणे कापणी, सरी पाडणे, सरीत बेणे लागवड, खत पेरणी व तणनाशक फवारणी करता येते. या यंत्राच्या साह्याने एक एकर ऊसलागवड फक्त 2.5 ते 3 तासात पूर्ण करता येते. यंत्र कार्यक्षमतेने चालविण्यासाठी किमान 45 एच पी ट्रॅक्टर आवश्यक आहे.
सरीतील अंतर बदलण्याची सुविधा, या यंत्राद्वारे ऊसाच्या दोन सरीतील अंतर: किमान 3 फूट ठेवता येते. आवश्यकता असल्यास त्यापेक्षा अधिक अंतरही ठेवता येते, शेतकऱ्यांसाठी खर्चात बचत होते. या यंत्रामुळे लागवड खर्चात मोठी बचत होऊन मजूर समस्येवर प्रभावी उपाय उपलब्ध होणार आहे. ऊस शेती परवडणारी करण्यासाठी लागवड खर्च कमी करणे आवश्यक आहे. केव्हीके दहिगाव-ने मार्फत राबविण्यात येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केव्हीके प्रमुख डॉ. कौशिक यांनी केले.
या यंत्रामुळे मला मजूर व विजेवर अवलंबून राहण्याची गरज उरली नाही. लागवडीचा खर्च व वेळ दोन्हीची बचत झाली, प्रगतशील शेतकरी मुकुंद टाक यांनी सांगितले. चाचणी वेळी प्रगतशील शेतकरी जगन्नाथ गादे, राजेंद्र जगदाळे, किशोर टाक, राजेंद्र गादे, साईनाथ गुंजाळ, मिठूआप्पा शेटे, रामभाऊ उंदरे, दत्तात्रय वंजारी आदी उपस्थित होते.