

कोपरगाव: ओव्हरटेक करताना मालमोटारीचा धक्का लागून तोल गेल्याने चाकाखाली सापडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. नगर-मनमाड महामार्गावरील कोकमठाणनजीक शनिवारी (दि. १) सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. मृत महिला ही शिर्डी संस्थानची कर्मचारी असल्याचे समजते.
आशा संजय आव्हाड (वय ४०, रा. कोपरगाव बेट) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. महामार्गावरील खड्डे आणि दुरवस्थेचा हा बळी असल्याचा आरोप करत स्थानिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.
आशा आव्हाड दुचाकीवरून (एमएच १७ बीडब्ल्यू ९०७) शिर्डीच्या दिशेने जात होत्या. स्वस्तिक हॉटेलजवळ पाठीमागून येणाऱ्या मालमोटारीने (जीजे १० टीएक्स ६७५८) ओव्हरटेकचा प्रयत्न केला. ओव्हरटेक करताना मालमोटारीचा धक्का आव्हाड यांच्या दुचाकीला लागला.
त्यामुळे दुचाकीवरील ताबा सुटला आणि त्या रस्त्यावर कोसळल्या. दुर्दैवाने मालमोटारीच्या चाकाखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. महामार्गावर पडलेले खड्डे, अर्धवट कामे आणि सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे रोजच अपघातांची मालिका सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला.
अपघाताला नॅशनल हायवे अथॉरिटी आणि प्रशासनच जबाबदार असून, पीडित कुटुंबाला शासनाने तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी संतप्त गावकऱ्यांनी केली आहे. शहर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.