

नगर: शहरातील वाळुंज परिसरातील नालंदा शाळेत तिसरीतील विद्यार्थ्याला मुख्याध्यापकाने अमानुषपणे मारहाण करून हाताचा चावा घेतला. ही घटना ३० जुलै रोजी घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौतम बहादुर्गे असे मुख्याध्यापकाचे नाव आहे. मुलाचे वडील सोनल अर्जुन शेळके (वय २९, रा. बुरुडगाव रस्ता, अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की त्यांचा आठ वर्षांचा मुलगा नालंदा शाळेत तिसरीमध्ये शिकत आहे. ३० जुलै रोजी सकाळी नेहमीप्रमाणे तो शाळेत गेला असता, वर्गात दोन विद्यार्थ्यांमध्ये भांडण झाले होते.
ती माहिती लहान विद्यार्थ्याने वर्गशिक्षिकेला दिली. वर्गशिक्षिकेने मुख्याध्यापक बहादुर्गे यांना बोलावून घेतले. मात्र, बहादुर्गे यांनी शहानिशा न करता उलट तक्रार करणाऱ्या मुलालाच दोषी ठरवले आणि त्याचा कान पिरगाळला. त्यानंतर बालकाला गळ्याला धरून हवेत उचलून धरले आणि त्याच्या हाताला जोरात चावा घेतला.
मुलाने घरी आल्यानंतर वडिलांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी मुलाला अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात नेऊन उपचार केले. त्यानंतर फिर्यादी सोनल शेळके यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या फिर्यादीवरून मुख्याध्यापक गौतम बहादुर्गे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.