

खेड: अमरापूर - बारामती राज्यमार्गावरील फुटपाथ आणि दुभाजकाचा मुद्दा गेली अनेक वर्षे प्रलंबित असून, या रस्त्यावरून जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. या संदर्भात माजी खा. सुजय विखे आणि आ. रोहित पवार यांनी भरसभांमध्ये फुटपाथ लवकरच होणार असल्याची घोषणा केल्या होत्या.
ग्रामस्थांनीही निवेदनांद्वारे हा प्रश्न वारंवार त्यांच्याकडे मांडला होता. मात्र, प्रत्यक्षात कोणतेही काम न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढली आहे. येथील लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयात मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना रस्त्यालगत फुटपाथ व दुभाजक नसल्याने वाहतुकीचा मोठा धोका पत्करून शाळेत जावे लागते. वेगाने धावणारी वाहने, वाढती रहदारी आणि सतत उसाने भरलेले ट्रॅक्टर यामुळे मुलांना रस्ता ओलांडणे त्यावरून चालणे खूपच धोक्याचे ठरत आहे. त्यातच रोज अपघातांच्या मालिका वाढत असल्याने पालकांमध्येही चिंता वाढली आहे.
फुटपाथ आणि दुभाजक न होण्यामागे काही स्थानिक नेत्यांचा व्यावसायिक हितसंबंधातून विरोध असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होत आहे. मात्र, या प्रकरणाचा नेमका अडथळा काय आहे? कोणत्या टप्प्यावर काम थांबले आहे? याबाबत आमदार व तत्कालीन खासदारांनी स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
अनेक वर्षांच्या आश्वासनांनंतरही कोणतीही प्रगती दिसत नसल्याने ग्रामस्थ आणि पालकांचा रोष वाढत चालला आहे. विद्यार्थी सुरक्षिततेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी फुटपाथ आणि दुभाजकाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.
आश्वासने देऊन पोळी भाजली!
सध्या खेड राज्यमार्गावर सतत अपघात होत आहेत. यात अनेकांचे जीवही जात आहेत. याचे कसलेही दुःख राजकारण्यांना वाटत नाही. माणसे मृत झाल्यानंतर मात्र कुटुंब भेटी घेऊन दुखवटा काढण्याला प्राधान्य देण्यात हे राजकारणी धन्यता मानतात. आश्वासने देऊन पोळी भाजणाऱ्या राजकारण्यांपासून आता सर्वांनी सावध राहायला हवे.