

कर्जत: तालुक्यातील ढेरे मळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये अज्ञात व्यक्तीने पाच वर्ग खोल्यांचे कुलूप तोडून वर्गातील शैक्षणिक साहित्याची तोडफोड केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. टीव्ही, साऊंड सिस्टिम तसेच शाळेची बोर व कॉम्प्युटर रूमचेही नुकसान करण्यात आले आहे.
रविवारी सकाळी मुले खेळण्यासाठी शाळेच्या मैदानामध्ये आले असताना त्यांना वर्गखोल्या उघड्या दिसल्या. रविवारी असूनही वर्ग खोल्या उघड्या कशा याचे कुतूहल मुलांच्या मनामध्ये निर्माण झाले आणि त्यांनी वर्गामध्ये जाऊन पाहिले असता त्यांना मोडतोड झालेला वर्ग, फोडलेला टीव्ही दिसला. त्यानंतर तत्काळ त्यांनी घरी जाऊन आपल्या पालकांना ही माहिती दिली. सर्व पालक शाळेमध्ये आले आणि त्यांनी शिक्षकांना देखील कळवल्यानंतर ते देखील शाळेमध्ये आले.
या प्रकारामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शाळेचे शैक्षणिक नुकसान झाल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. श्वानपथकही पाचारण करण्यात आले असून तज्ज्ञांकडून ठसे घेण्यात आले आहे.
अस्ताव्यस्त साहित्य पाहून विद्यार्थी भावनिक झाले. दुष्ट माणसाने आमच्या शाळेचे नुकसान केले. आता आम्ही कुठे बसायचे? कसे शिकायचे? अशी व्यथा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, ग्रामस्थांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला असून आरोपीला तात्काळ शोधून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा विद्यार्थ्यांसह पोलिस ठाण्यावर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थ भूषण ढेरे, बबन ढेरे, सचिन गुंड व परिसरातील सर्व नागरिकांनी दिला आहे.
विद्यार्थी भावुक
ही घटना घडल्यानंतर एका विद्यार्थिनीने या घटनेविषयी चित्र काढून आपली भावना व्यक्त केली. आम्ही सर्व विद्यार्थी आनंदी होतो, दुष्ट माणसाने हे कृत्य केले. बघा तुम्हीच. आता आम्ही वर्गात कसे जाणार व कोठे बसणार आणि कसे शिकणार असे तिने म्हटले आहे.