

पाथर्डी: येथील श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रंगतदार फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. या फूड फेस्टिव्हलचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष दिलीपशेठ भांडकर व मुख्याध्यापक एकनाथ ढोले यांच्या हस्ते झाले.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतः विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करून विक्रीस ठेवले होते. यामध्ये पाणीपुरी, शेवपुरी, भेळ, सँडविच, बर्गर, पिझ्झा, नूडल्स, मंचूरियन, फ्रेंच फ्राइज, चाट पदार्थ, फळांचे व भाज्यांचे सॅलड, मिल्कशेक, आइस्क्रीम, तसेच काही पारंपरिक घरगुती पदार्थ यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी सजवलेले आकर्षक स्टॉल्स फूड फेस्टिव्हलचे विशेष आकर्षण ठरले.
या फूड फेस्टिव्हलला पालक, शिक्षक व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. पालक व विद्यार्थ्यांनी विविध पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतला. स्वतःचे पदार्थ विकताना, ग्राहकांशी संवाद साधताना आणि व्यवहार करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. व्यापारी म्हणून काम करताना विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास स्पष्टपणे वाढलेला दिसून आला. भांडकर म्हणाले की, आजच्या काळात विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण न देता जीवनोपयोगी कौशल्ये देणे गरजेचे आहे. फूड फेस्टिव्हलसारखे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये कष्टाची किंमत, नियोजन, आर्थिक व्यवहार आणि संघभावना निर्माण करतात. उत्तम संस्कार हेच खरे शिक्षण मानून आमची संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.
मुख्याध्यापक ढोले म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत विविध उपक्रम राबवले जातात. या फूड फेस्टिव्हलमुळे विद्यार्थ्यांच्या व्यवहारज्ञानात भर पडली असून, भविष्यातील विविध व्यावसायिक क्षेत्रांची ओळख त्यांना मिळाली आहे. आजच त्यांच्या मनामध्ये उद्योजकतेचे बीज रोवले गेले, हीच या उपक्रमाची खरी यशस्वीता आहे. कार्यक्रमात विद्यार्थिनी अस्मिता फुंदे हिने सादर केलेल्या बाई सुया घे गं, दाभण घे गं या गाण्यावर आधारित नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. फेस्टिव्हलमध्ये विद्यार्थ्यांकडून सुमारे 1 लाख 5 हजार रुपयांची उलाढाल झाली.
या उपक्रमासाठी सोनाली सोनवणे, प्रविणा गोल्हार, अनिता सोनवणे, सुधीर पगारे, स्मिता चिंतामणी, प्रसाद मरकड, बंडू गाडेकर, आत्माराम साबळे, वैशाली घायाळ, मनीषा नलावडे, सचिन गवळी, सायली डांगे, मयुरी देशमुख, अनिकेत झेंडे, कृष्णा होनमने यांचे मोलाचे सहकार्य लाभले.