

नगर: झेडपीच्या शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा व त्यांच्यात विज्ञान, संशोधनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी पाचवी ते आठवीतील पात्र 42 विद्यार्थ्यांनी काल सकाळी डॉ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर, भुंबा, केरळ येथे ‘इस्त्रो’ सहलीसाठी उड्डाण केले.
जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषदेमार्फत अनेक उपक्रम राबविले जातात. यातीलच इस्त्रो सहल एक भाग आहे. पात्र 42 विद्यार्थ्यांची निवड पारदर्शक चाचणीतून झाली.
सहलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना भावी संशोधक होण्याच्या दृष्टीने इस्त्रो सहल ही महत्त्वाची समजली जाते. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांचे मार्गदर्शनानुसार शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी याही वर्षी विमानाने सहलीचे नियोजन केले. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सेसमधून तरतूद करण्यात आली होती.
सहलीचा कालावधी दि.19 ते दि.23 जानेवारी असा आहे. सहलीसाठी तालुका जिल्हास्तरीय निवड चाचणीद्वारे निवडलेले 42 विद्यार्थी व त्यांच्या समवेत गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते मांगुळकर, विलास साठे, राजेंद्र नायर, प्रशांत सदावर्ते, अंतोन पवार, संगीता लोखंडे, प्रशांत दिघे असे 8 अधिकारी, शिक्षक कर्मचारी असा 50 जणांचा समावेश आहे.
सहलीमध्ये काय काय अभ्यासणार?
सहलीमध्ये विद्यार्थी बंगळुरू येथील भारतीय अवकाश संशोधन संस्था, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, सर विश्वेश्वरय्या म्युझीअमला भेट देणार आहेत. तसेच डॉ. विक्रम साराभाई अवकाश केंद्र, थुंबा, केरळ येथे संग्रहालय, त्रिवेंद्रम येथील प्राणी संग्रहालय व मत्स्यालयाला भेट देणार आहेत.