

कर्जत : कर्जत नगरपंचायतने शहरात असणारे अनधिकृत असे 19 होर्डिंग्ज हटवली आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी अक्षय जायभाय यांनी दिली.
कर्जत शहरामध्ये रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग्ज उभे करण्यात आले होते. उच्च न्यायालयाने विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनेनंतर सर्व अनधिकृत होर्डिंग्ज काढून टाकण्याबाबत आदेश दिले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी कर्जतमध्ये झाली नव्हती. ती करण्यात आली आहे.
शहरामध्ये असणारे सर्व अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याचा निर्णय नगरपंचायतने घेतला होता. मात्र, याबाबत कमालीची गुप्तता पाहण्यात आली होती. सकाळी मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा अचानक रस्त्यावर उतरला.
परिसरातील ठिकठिकाणी चौकात नाकाबंदी करण्यात आली. त्यानंतर मुख्याधिकारी अक्षय जायभाय, पोलिस निरीक्षक सोपानराव शिरसाठ व नगरपंचायतचे पथक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी मोठ्या क्रेनच्या सहाय्याने अनधिकृत होर्डिंग्ज हटवण्यास सुरुवात केली. दिवसभरात एकूण 19 होर्डिंग्ज काढण्यात आले आहे.
कर्जत नगरपंचायत व पोलिस विभागाच्या मदतीने शहरातील उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार 19 अनधिकृत होर्डिंग्ज काढले असून, यापुढे अशा पद्धतीने विनापरवाना होर्डिंग्ज लावल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल.
अक्षय जायभाय, मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपंचायत