

कर्जत: संत गोदड महाराज समाधी मंदिर नवीन विश्वस्तांची नेमणूक ही नियमानुसार झालेली असून योग्य वेळी सर्व पुरावे भाविकांसमोर मांडले जाईल, अशी माहिती नवीन विश्वस्त मंडळाचे उपाध्यक्ष प्रवीण घुले यांनी देतानाच विनाकारण खोटी माहिती देवून भाविकांना वेठीस धरू नका, असे आवाहन केले.
कर्जतचे ग्रामदैवत संत गोदड महाराज समाधी मंदिराच्या नवीन विश्वस्तांवरून वाद निर्माण झाल्याचे चित्र समोर आले. मानकरी व पुजऱ्यांनी नवीन विश्वस्त मंडळास विरोध दर्शवत आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर नवीन विश्वस्त मंडळाच्यावतीने प्रवीण घुले यांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडली. नवीन विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष प्रदीप पाटील, सचिव शशिकांत पाटील, सदस्य तानाजी पाटील, नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल व भास्कर भैलुमे, विलास धांडे विश्वजीत काकडे व बाळासाहेब पाटील उपस्थित होते.
प्रवीण घुले म्हणाले, 1954 सालात जे विश्वस्त मंडळ, पुजारी काम करत होते, त्यातील अनेकांचे निधन झाले आहे. त्यानुसार ट्रस्ट चेंज रिपोर्टची मागणी धर्मदाय आयुक्तांकडे केली होती. त्याला परवानगी मिळाली आहे. नियमानुसारच हे केले गेले. सुरुवातीला सहा महिन्याची ऑर्डर देण्यात आली. नंतर वार्षिक सर्वसाधारण सभा घेत मतदान घेऊन विश्वस्त मंडळ निवडले आहे. ही प्रक्रिया पाहता उपोषण, बंद सारखे चुकीचे प्रकार सुरू आहे. ते तत्काळ बंद करावे. काही जण मंदिरासमोरच खोटे आरोप करत आहेत. वास्तविक गत 13 वर्षापासून विश्वस्त मंडळ नेमण्यासाठी न्यायालयीन संघर्ष सुरू आहे. पूर्वी निशिकांत पाटील त्यानंतर तानाजी पाटील हे यासाठी काम करत आहेत. विश्वस्त मंडळ नेमणुकीसाठी आंदोलन करणाऱ्या काहींच्या घरी जावून त्यांच्या सह्या मागितल्या असल्याने कोणाला अंधारात ठेवण्याचा प्रश्नच नाही.
लाखोंच्या वर्गणांच्या हिशेबाचे काय?
संत गोदड महाराज यांच्या आशीर्वादानेचे नवीन विश्वस्त मंडळ अस्तित्वात आले आहे. आज जे मंडळी विरोध करत आहेत त्यांचा मंदिरामध्ये सुधारणा करण्यासाठी विरोध असल्याचे दिसते. आज मंदिरामध्ये ज्या पद्धतीने पूजा व कार्यक्रम सुरू आहेत, ते पूर्णपणे अयोग्य व चुकीचे आहेत. शास्त्रीय पद्धतीने महाराजांची सेवा होत नाही. सण उत्सव साजरे करताना आजपर्यंत लाखो रुपयांच्या वर्गण्या गोळा केल्या गेल्या, मात्र त्याचा हिशेब कुठेही दिला नाही. विश्वस्तांच्या नावावर रुपयांचाही व्यवहार केलेला नाही. दान केलेल्या वस्तू, पैसे कुठे गेले?, मंदिर कळस जिर्णोध्दार देणग्यांचे काय झाले. त्यांच्या सगळ्या भानगडी माहिती आहे, योग्य वेळी त्या भाविकांसमोर जाहीर केल्या जातील. महाराजांनी मान दिलेल्यांना काय ठेवण्यात आले. सर्व जाती धर्माच्या नागरिकांना सामावून घेतले जाईल, असे घुले यांनी माध्यमांसमोर सांगितले.
गत तेरा वर्षांपासून विश्वस्तांच्या विरोधातच न्यायालयामध्ये लढाई सुरू होती. अंधारामध्ये ठेवून भाविकांना फसवून नवीन विश्वस्त नेमणुकी झाल्या, असे म्हणणे चुकीचे आहे. जे आंदोलनात सहभागी होत आहेत त्यांना याची माहिती आहे. आंदोलन करणाऱ्यांनी यापूर्वी विश्वस्तासाठी सह्या केल्या आहे, मात्र दुर्दैवाने ते त्यावेळी मंजूर झाले नाही, अन्यथा आज आंदोलन करणारे देखील यामध्ये दिसले असते. गावकरी व भाविकांची दिशाभूल कोणी करू नये.
प्रदीप पाटील, अध्यक्ष, नवीन विश्वस्त मंडळा