

चिचोंडी शिराळ: मुळा धरणातून वांबोरी चारीला पाणी सोडण्याच्या प्रतीक्षेत फेब्रुवारी महिना संपला, तरीही चिचोंडी, शिराळ, कोल्हार, उदरमल, मिरी भागातील गावांना पाण्याचा एक थेंबही मिळाला नाही. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे ऐन उन्हाळ्यात फळबागा जळून खाक होण्याची भीती निर्माण झाली आहे. लाभधारक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
पाथर्डी, नगर आणि राहुरी तालुक्यातील 45 गावांसाठी वांबोरी चारी ही खऱ्या अर्थाने जलसंजीवनी मानली जाते. या योजनेद्वारे 102 पाझर तलाव भरण्याचे नियोजन असते. यावर्षी पाऊस समाधानकारक झाला असला, तरी या भागाची भौगोलिक रचना डोंगराळ असल्याने जानेवारीनंतर पाण्याची पातळी झपाट्याने खाली जाते. हक्काचे 680 एम.सी.एफ.टी. पाणी जानेवारीत सुटणे अपेक्षित असताना, दोन महिने उलटूनही शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचले नाही.
काही दिवसांपूर्वी वांबोरी चारीला पाणी सोडण्यात आले होते, परंतु त्याचा फायदा केवळ राहुरी तालुक्यातील वांजोळी आणि गुंजाळे भागापर्यंतच झाला. त्यानंतर पाणी बंद होऊन महिना उलटला आहे. आमच्या हक्काच्या पाण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन कधी जागे होणार? असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत. रब्बी हंगामाची पिके सध्या जोमात असून, त्यांना आता पाणी मिळाले नाही, तर हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती आहे. मुळा धरणातून उजव्या कालव्याद्वारे शेतीसाठी 1 मार्चपासून 700 क्यूसेक वेगाने आवर्तन सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
या लढ्यासाठी शेतकरी आक्रमक झाले असून प्रशासनाला जागे करण्यासाठी आणि तातडीने पाणी सोडण्यासाठी भागातील प्रमुख नेते आणि शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. संतोषराव गरुड, सातवडचे सरपंच राजेंद्र पाठक,राष्ट्रवादी उपाध्यक्ष अंबादास डमाळे, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल गायकवाड, पोपटराव आव्हाड,सरपंच रवींद्र मुळे प्रादेशिक नळ योजनेचे उपाध्यक्ष भीमराज सोनवणे, माजी सरपंच विष्णू गंडाळ, राजेंद्र गिते, विजय पालवे, सुखदेव गिते, भास्कर अटकर, भगवान फुलमाळी आदींनी प्रशासनाकडे दाद मागितली आहे.
जानेवारीतच पाणी सुटणे अपेक्षित होते. आता उजव्या कालव्याचे पाणी सुटल्यावर आमचे पंपिंग सुरू होणार की नाही, हा प्रश्न आहे. प्रशासनाने आता तरी गांभीर्याने लक्ष देऊन 45 गावांना जलसंजीवनी द्यावी.
राजेंद्र गिते, लाभधारक शेतकरी प्रतिनिधी