

दीपक ओहोळ
नगर: गेल्या तेरा महिन्यांत जिल्ह्यातील 115 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. आत्महत्येसाठी कर्जबाजारीपणा, नापिकी तसेच उत्पादन खर्चदेखील शेतमालाच्या विक्रीतून पुरेसा मिळत नसल्याचे कारण दिले जात आहे. आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून विविध योजना आणि सवलती पुरविल्या जात असल्या तरी जिल्ह्यात चार दिवसांत सरासरी एका शेतकऱ्याने गळफास जवळ केल्याचे वास्तव समोर आले आहे.
एकेकाळी वीस-पंचवीस वर्षांपूर्वी नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या करत असल्याचे चित्र होते. पश्चिम महाराष्ट्रात शेती बागायती आणि त्याला दुधाचा जोडधंदा आदीमुळे येथील शेतकरी सुखी आणि सधन असल्याचे या भागातील शेतकरी आत्महत्या करत नसल्याचे चित्र होते.
परंतु हळूहळू परिस्थितीमध्ये बदल होऊ लागला. गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून निसर्ग बदलत असून, ऋतुनुसार पाऊस पडत नाही. तीन महिन्यांची सरासरी आठ-पंधरा दिवसांच्या पावसात भरु लागली. वेळेवर पाऊस झाला तरच खरीप पिके हाती लागतात. पिके चांगली असल्यास मध्येच अवकाळी पाऊस पडून हातीतोंडी आलेले पीक नाहिसे होत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक खाईत लोटला जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून शेतमालाला भव मिळत नसल्याने पिकांच्या मशागतीसाठी खर्च झालेला पैसादेखील शेतकऱ्यांच्या हाती लागत नाही. त्यामुळे बँकेचे तसेच सावकारी कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण होत असल्याने जगणेच नको अशी मानसिकता वाढीस लागली आहे. बँका आणि खासगी सावकारीच्या तगादीला वैतागलेला शेतकरी शेवटी गळफास जवळ करु लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यात हे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे.
2024 मध्ये 50 आत्महत्या झाल्या. गेल्या वर्षी 2025 मध्ये जिल्ह्यातील 107 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयातील टंचाई विभागात नोंद झालेली आहे. यामध्ये सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक 14 तर नोव्हेंबर महिन्यात 13 शेतकऱ्यांचा समावेश आहे. 2026 वर्षाच्या पहिल्याच जानेवारी महिन्यात सात शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे.
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जात आहेत. अतिवृष्टी आणि नापिकी आदीसाठी पीकनिहाय अनुदान उपलब्ध करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही स्वयंसेवी संस्थांकडून देखील काही प्रमाण मदत आणि मार्गदर्शन केले जात आहे. असे असले तरी शेतकरी आत्महत्या काही रोखण्यास शासनाला वा लोकप्रतिनिधींना यश येताना दिसत नाही.
महिनानिहाय संख्या
जानेवारी :9, फेब्रुवारी: 5, मार्च: 4, एप्रिल: 6, मे: 7, जून: 8, जुलै: 13, ऑगस्ट: 10, सप्टेंबर: 14, ऑक्टोबर :12, नोव्हेंबर: 13, डिसेंबर 6.
23 वर्षांत 1306 कुटूंबे झाली पोरकी
गेल्या 23 वर्षांत जिल्ह्यातील 1 हजार 306 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. यामध्ये 2016 मध्ये सर्वाधिक 144 तर 2017 मध्ये 140 शेतकऱ्याचा समावेश आहे. यापैकी 655 शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा आणि नापिकी या कारणामुळे आत्महत्या केल्याचे सिध्द झाले. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला एक लाख रुपयांची मदत अदा झालेली आहे.