

नगर: देशाची जनगणना 2027 मध्ये घेण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी पूर्वतयारी सुरु झाली असून, ही जनगणना पहिलीच डिजिटल असणार आहे. पहिल्या टप्प्यांत मे-जूनपर्यंत जिल्ह्यातील घरयादी व घरगणना प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पूर्वतयारी सुरु झाली आहे. 2027 पर्यंत जिल्ह्याची लोकसंख्या 53 ते 54 लाखांवर जाण्याची शक्यता आहे.
देशाची पहिली दशवार्षिक जनगणना 1872 पासून सुरु झाली. 2027 ही जनगणना भारतीय जनगणनेची सोळावी जनगणना तर स्वतंत्र भारतातील आठवी जनगणना असणार आहे. मात्र, ही पहिलीच डिजिटल जनगणना असणार आहे. देशात कल्याणकारी ध्येय धोरणे राबविण्यासाठी लोकसंख्येची सखोल माहिती आवश्यक असल्याने जनगणना महत्त्वपूर्ण ठरत आहे.
2011 मध्ये जाहीर झालेल्या जनगणनेनुसार जिल्ह््याची लोकसंख्या 45 लाख 43 हजार 189 इतकी होती. दहा वर्षानंतर म्हणजे 2021 मध्ये जनगणना जाहीर होणे अपेक्षित होते. परंतु कोरोना साथीमुळे जनगणना रखडली गेली. जिल्हा सांख्यिकी विभागाच्या अहवालानुसार सप्टेंबर 2025 पर्यंत जिल्ह््याची लोकसंख्या 52 लाख इतकी होती, 2027 पर्यंत हा आकडा 54 लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
भारत सरकारने 2027 मध्ये जनगणना घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही जनगणना दोन टप्प्यांत होणार असून, पहिल्या टप्प्यात घरयादी व घरगणना होणार असून, ही प्रक्रिया मे-जून 2026 पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्येची गणना केली जाणार असून, ही प्रक्रिया फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये पूर्ण केली जाणार आहे. या जनगणनेबाबत जिल्हा प्रशासनाला पूर्वतयारीचे आदेश प्राप्त झाले आहेत.
जनगणनेसाठी आवश्यक नकाशे तयार करणे, प्रगणकांच्या नियुक्त्या आणि त्यांचे प्रशिक्षण याची पूर्वतयारी प्रशासनाच्या वतीने सुरु आहे. या कामासाठी सर्वच शासकीय यंत्रणा सहभागी होणार आहे. शालेय परीक्षा झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. शक्यतो 4 मार्चपासून प्रशिक्षण सुरु होण्याची शक्यता आहे. तालुका ठिकाणी तहसीलदार, नगरपालिका कार्यक्षेत्रात मुख्याधिकारी तर महापालिका कार्यक्षेत्रासाठी महापालिका आयुक्त हे चार्ज जनगणना अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत.