

कर्जत: तालुक्यातील नागरिकांना रोजगाराची हमी देणारी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) शहरातील नगरपंचायत हद्दीमध्ये लागू नसल्याने अनेकांना रोजगाराच्या संधींपासून वंचित राहावे लागत आहे.
या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी भाजप तालुकाध्यक्ष अनिल गदादे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांना निवेदन देऊन योजना तातडीने लागू करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी त्यांच्या समवेत युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस विनोद दळवी, भाजपचे ज्येष्ठ नेते प्रसाद ढोकरीकर, सचिन घुले, राहुल गांगर्डे, अमोल भगत हे उपस्थित होते.
कर्जत नगरपंचायत हद्दीतील रहिवासी हलाखीचे जीवन जगतात. त्यापैकी अनेकजण आर्थिकदृष्ट्या मागासलेले असून, रोजंदारीवर आपला उदरनिर्वाह भागविणारे आहेत. मात्र, मनरेगा योजना केवळ ग्रामपंचायत हद्दीमध्येच राबविली जात असल्याने कर्जत नगरपंचायत क्षेत्रातील रहिवाशांना याचा थेट लाभ मिळत नाही. परिणामी, रोजगाराच्या संधी मर्यादित होत असून, अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते.
भाजप कर्जत तालुकाध्यक्ष अनिल गदादे यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांनी सभापती शिंदे यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन सादर केले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, कर्जत नगरपंचायत परिसरात मनरेगा योजना लागू झाल्यास शहरातील मोठ्या संख्येने असलेल्या कामगार, अल्पभूधारक व सर्वसामान्य नागरिकांना रोजगाराची हमी मिळेल. तसेच महापालिका व नगरपंचायत हद्दीमध्ये सध्या मनरेगा योजना लागू नसल्याने अनेक विकासकामेही रखडत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
रोहयाचा लाभ मिळायलाच हवा: प्रा. शिंदे
सभापती शिंदे यांनी निवेदनाचा सकारात्मक विचार करून तातडीने संबंधित विभागाशी बोलून आवश्यक ती मार्गदर्शक सूचना देण्यात येतील, असे आश्वासन भाजप पदाधिकाऱ्यांना दिले. नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांनाही ग्रामपंचायत क्षेत्राप्रमाणे रोजगार हमीचा लाभ मिळायला हवा, असे त्यांनी स्पष्ट केले.